Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सीझर हा रोममधला अत्यंत हुषार व पाताळयंत्री मुत्सद्दी होता.  पण तो जगांतील अत्यंत हुषार अशा एका नारीच्या हातांतील बाहुलें बनला !  रोमला परतून येथील आपसांतील यादवी बंद करण्याऐवजीं तो ईजिप्तमध्येंच कित्येक महिने रेंगाळत राहिला.  क्लिओपाट्रा हिचें कोमल बंधन तोडणें, तिच्या मंत्रमुग्धतेंतून मुक्त होणें, त्याला जड जात होतें.  आयुष्याच्या सायंकाळी आरंभिलेल्या त्या अनंगरंगांत तो दंग झाला !  तिनें त्याला नील नदींत नौकाविहार करण्यास चला म्हणून विनवितांच तो कबूल झाला.  राजशाही नौका सिध्द झाली.  ती जणूं तरता राजवाडाच होती !  तिच्यावर नारिंगी व शेंदरी पडदे सोडण्यांत आले होते ; नौकेचा नाळ सोन्याचा होता, वल्हीं चांदींचीं होतीं, पन्नास वल्हेंवाले डुबकडुबक करीत वल्हीं मारीत तेव्हां त्यांचीं चांदीची टोंकें कशी चमकत ! पूर्वी कोणत्याहि मर्त्य मनुष्यानें अनुभविलें नसेल अशा साम्राज्याच्या स्वप्नांत तो स्वत:ला विसरून गेला !  तो मनांत म्हणत होता, ''मी आतां इटलींत जाईन, काल्पूर्नियाशीं काडीमोड करीन, क्लिाओपाट्रा हिला आणीन व मग देवाच्या दयेनें आम्ही उभयतां रोम, ईजिप्त व सारी पृथ्वी यांचे स्वामी होऊं.  मीं पूर्वी धर्माचार्य असतां केलेली देवांची सेवा देव थोडेच विसरतील ? ते माझें स्वप्न पुरें करतीलच.''

सीझर क्लिओपाट्रा हिच्या बाहुपाशांत स्वप्नसृष्टींत रमला होता ; ईजिप्तमधील सुंदरींच्या हातांतल्या बांसर्‍यांवरील गीतवादन तो ऐकत होता.  पण तिकडे पाँपेचे मित्र कांही स्वस्थ बसले नव्हते.  त्यांनी निरनिराळ्या रोमन प्रांतांत बंडाळ्या उभ्या केल्या.  खुद्द रोम शहरहि बंड करून उठलें.  सीझर वेळींच न उठल्यास व त्यानें तिकडे लक्ष न दिल्यास त्याचेंहि डोकें पाँपेच्या डोक्याप्रमाणेंच भाल्याच्या टोंकावर नाचविण्यांत येण्याचा संभव दिसूं लागला.

म्हणून त्यानें मोठ्या नाखुषीनें ईजिप्तमधील मेजवान्या, सुखोपभोग व विलास आणि उंची वस्त्रें टाकून देऊन रणवेश (चिलखत व शिरस्त्राण) धारण केला.  क्लिओपाट्रा हिच्या पोटांत गर्भ वाढत होता.  निघतांना त्यानें तिला 'बाळ जन्माला येतांच मी तुला घेऊन जाईन' असें अभिवचन दिलें.

सीझर एकदम रोमला गेला नाहीं.  आपण ईजिप्तमधील सुखोपभोगांत रंगालों, दंग झालों याबद्दल त्याला लाज वाटत होती.  त्याच्या मित्रांची व चाहत्यांची तो ईजिप्तमधील रणांगणावर मोठमोठे विजय मिळवील अशी अपेक्षा होती.  पण त्यानें केवळ एकच विजय मिळविला.  आणि तोहि कोठें ? तर ईजिप्तच्या राणीच्या विलास-मंदीरांत ! क्लिओपाट्रा हिच्या सदिच्छांहून अधिक भरीव असे कांही तरी रोमला घेऊन जावें अशी त्याची मनीषा होती.  म्हणून आशियामायनरमधील एका बंडखोर प्रांतावर—पॉन्टसवर—त्यानें स्वारी केली व फारशी तकलीफ न पडतां येथील बंडाचा मोड केला.  नंतर आपण पूर्वीचाच प्रतापी सीझर आहों हें रोमन जनतेला पटविण्यासाठीं आपल्या विजयाचें वर्णन ''मी आलों, मी पाहिलें आणि मीं विजय मिळविला !'' या तीन सुप्रसिध्द गर्विष्ठ व अहंमन्यतापूर्ण वाक्यांत पाठविलें.  जणूं मर्त्यांशीं दोन शब्द बोलण्याची कृपा करणार्‍या एकाद्या देवदूताचेच ते शब्द होते !  तो रोमला यावयांस सिध्द झाला.

« PreviousChapter ListNext »