Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ६ वें
नाझारेथचा बहिष्कृत ज्यू येशू
- १ -

क्षणभर रोमन लोकांची खुनाखुनी बाजूस ठेवून आपण जरा दूर जाऊं या.  रोमन लोकांचीं तीं भांडणें, ते कोलाहल, ते गदारोळ तसेच सोडून आपण पूर्वेकडच्या अधिक शांतताप्रिय राष्ट्रांकडे जरा जाऊं या.  इकडे अलेक्झांडर, हॅनिबॉल, सीझर जगाला आपल्या महत्त्वाकांक्षांनीं व खाटिकखान्यांनीं हैराण करीत असतां पूर्वेकडील हिंदु, चिनी व ज्यू राष्ट्रें शांतीचे महात्मे जगाला देत होतीं.

हिंदुस्थानांत थोर सम्राट् अशोक होऊन गेला.  ख्रि. पू. २६४ ते ख्रि. पू. २२७ पर्यंत त्यानें राज्य केलें.  एका मोठ्या युध्दांत त्याला विजय मिळाला होता.  पण युध्दांतील क्रूरता व भीषणता प्रत्यक्ष पाहून त्याला युध्दाचा वीट आला व पुन: म्हणून युध्द करावयाचें नाहीं असें त्यानें ठरविलें व युध्दऐवजीं सदिच्छेचा, बंधुभावाचा व प्रेमाचा संदेश जगभर पसरविणें हेंच आपलें जीवनकार्य केलें.

चीनमध्यें कन्फ्यूशिसचे अनुयायीहि शांतिप्रसार करीतच होते.  कुआंगत्से, मेन्सियस, मोटि, इत्यादि चिनी शांतिदूतांनीं आपल्याच बांधवांची प्रेतें तुडवीत जाण्यापेक्षा निराळ्याच मार्गानें जीवन कसें कंठावें हें शिकविलें.  त्यांनीं शांतीचा मार्ग शोधला.  कधीं कधीं मेन्सियसची वाणी प्रेषितांच्या वाणीप्रमाणें भासे.  तो म्हणतो, ''श्रीमांतांच्या घरांत चरबी आहे, मांस आहे, तर गरिबांच्या पोटाच्या दामट्या वळल्या आहेत ! श्रीमंतांच्या तबेल्यांत धष्टपुष्ट घोडे आहेत, तर दरिद्री लोक भुकेनें मरत आहेत ! जिकडे तिकडे उपाशीं मेलेल्या लोकांचे मुडदे पडलेले आहेत ! ....श्वापदें माणसांना व माणसें एकमेकांना खातील.'' एपिक्युरसनें स्वार्थाचाच उपदेश केला ; पण अविरोधी, शहाण्या स्वार्थाचा.  मेन्सियसनें तेंच ध्येय चिनी जनतेपुढें ठेविलें.  तो उपदेशितो, ''सुख खुशाल भोगा, स्वत:च्या सुखासाठीं जरूर खटपट करा ; पण दुसर्‍यांच्या सुखाआड येऊं नका म्हणजे झालें.'' एपिक्युरसप्रमाणें व येशूप्रमाणें मेन्सियसलाहि लहान मुलें फार आवडत.  तो लिहितो, ''ज्याचें हृदय लहान मुलाच्या हृदयासारखें असतें तोच खरा मोठा.''

मेन्सियसच्या शब्दांपेक्षांहि मोटीची उपदेशवाणी अधिक सुंदर आहे.  उदाहरणार्थ, पुढील उतारा पाहा : — ''एका राज्यानें दुसर्‍या राज्यावर हल्ले चढविणें, एका कुटुंबानें दुसर्‍यास लुबाडूं पाहणें, माणसांनीं एकमेकांस लुटणें, राजांनीं निर्दय असणें, प्रधानांनीं अप्रामाणिक असणें, पिता-पुत्रांत वात्सल्याचा व पितृभक्तिचा अभाव असणें, इत्यादि गोष्टी साम्राज्याला अपायकारक असतात.  परस्पर-सहानुभूति व प्रेम दर्शविण्याचा सद्‍गुण सर्वांच्या जीवनांत येईल तर केवढी मौज होईल ! राजे एकमेकांवर प्रेम करूं लागतील तर रणांगणांची जरूरीच भासणार नाहीं.  सर्वत्र प्रेम असेल तर कुटुंबांतील कोणीहि एकमेकांस लुबाडणार नाहींत.

« PreviousChapter ListNext »