Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुढील अठरा वर्षांत त्यानें काय काय केलें तें समजत नाहीं.  वयाच्या तिसाव्या वर्षी तो पुन: आईबापांना सोडून गेला व जॉर्डन नदीच्या तीरावर भटकत राहिला.  तेथेंच तो जॉन दि बॅप्टिस्ट याच्या क्रान्तिकारक पक्षास मिळाला.  जॉन हा एक संन्यासी होता.  तो वृत्तीनें आडदांड व क्रान्तिकारक होता.  तो द्वेषाचें उपनिषदच शिकवी.  अनुतपतांना वांचविण्यांत त्याला विशेष आनंद वाटत नसे, तर अननुतपतांना शिव्याशाप देण्यांत व त्यांना शासन करण्यांत त्याला खरा आनंद वाटे.  सुखोपयोग म्हणजे त्याच्या मतें पाप व धनदौलत, इस्टेट असणें लाजिरवाणें.  या जीवनांत सुख मिळवूं पाहणें म्हणजे पुढें कायम नरकाचा धनी होणें होय असें तो सांगे.  स्वत:चा उध्दार व्हावा असें वाटत असेल त्यानें दारिद्र्याचें व्रत घ्यावें, अंगावर चिंध्या घालाव्या, केस कसे तरी वाढवावे, स्वत:ला असुखी करावें, ईश्वराच्या आज्ञा पाळाव्या व आपल्या (जॉनच्या) म्हणण्याप्रमाणें वागावें, असे जॉन दि बॅप्टिस्ट प्रतिपादीत असे.

ही मतप्रणाली जरी प्रखर वैराग्याची व जरी असंस्कृत असली, तितकीशी सुंदर नसली, तरी येशू तिच्याकडे ओढला गेला.  जॉनप्रमाणेंच तोहि बंडखोर होता, रुढींचा द्वेष्टा होता.  त्याला आजूबाजूच्या लोकांच्या दंभाची मनस्वी चीड येई.  जॉर्डन नदीच्या पाण्यानें येशूला शुध्द करून घेऊन नवदीक्षा देण्यांत आली.  तो जॉनचा मुख्य शिष्य, पट्टशिष्य झाला.

पुढें जॉनला अटक झाली व येशू एकटाच राहिला.  तो रानावनांत भटकत राहिला.  मूसा, बुध्द वगैरेंच्याप्रमाणेंच त्यानेंहि केलें.  अनंतर आकाश व निर्जन वन यांच्या सांनिध्यांत राहून तो विचार करूं लागला.  त्या गंभीर शांततेंत त्याची विचारवेल फुलली व बहरली.  तो आपल्या जन्मग्रामीं परत आला.  आपल्या लोकांना नवीन संदेश द्यावयास तो अधीर झाला होता.

पण त्याला धोंडे मारून त्याची हुर्रेवडी उडविण्यांत आली !  त्याच्या कुटुंबीयांनीं त्याला हांकलून दिलें व 'त्याचा आमचा कांहींहि संबंध नाहीं, तो एक भटक्या व निकामी माणूस आहे' असें म्हटलें.  नाझारेथच्या प्रमुख नागरिकांनीं 'जर येथील शांततेंत तूं व्यत्यय आणशील, बिघाड करशील तर तुला कड्यावरून खालीं लोटून देऊं' अशी धमकी दिली.  भटकून भटकून बाळ परत घरीं आला तों सारे दरवाजे आपणास बंद आहेत असें त्याला आढळून आलें.  रानांतील पशूंनाहि गुहा असते, पक्ष्यांनाहि घरटीं असतात, पण नाझारेथच्या या परित्यक्ताला मात्र डोकें टेंकावयाला कोठेंहि जागा नव्हती.

« PreviousChapter ListNext »