Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्यानें सुखी असण्याचें केवळ सोंग केलें नव्हतें. त्याला आपलें हौतात्म्य दाखविण्याची असोशीहि नव्हती किंवा आपण मोठे त्यागवीर आहों अशी दवंडी पिटण्याचीहि इच्छा नव्हती. सेंट फ्रॅन्सिस हा फकीर होता. पण तो स्वत:ची टिमकी वाजविणारा नव्हता. तो ईश्वरासाठीं तर फकीर झालाच होता, पण त्याहिपेक्षां अधिक मानवबंधूंसाठीं झाला होता. आपले लाखों बंधू असुखी असतां आपण सुखांत राहावें याची त्याला लाज वाटे. लाखों उपाशी असतां आपण धृतकुल्या, मधुकुल्या खात बसावें हें त्याला कसेंसेंच वाटे. पण म्हणून जगाला कंटाळलेल्या एकाद्या माणसाप्रमाणें तो रानावनांत मात्र गेला नाहीं, तर दरिद्री, परित्यक्त, निराधार, रोगी अशा लोकांत मिसळला. तो त्यांची क्षुधा शांत करी, त्यांची सेवाशुश्रूषा करी, त्यांना त्यांचा स्वाभिमान देई. तो स्वत:चा फार कमी विचार करी म्हणूनच तो अतिशय सुखी होता. तो दुसर्‍यांचा अधिक विचार करी. त्याला मिळणार्‍या अन्नांतला जाडाभरडा तुकडा तो स्वत:साठीं ठेवून गोडधोड दुसर्‍यांना देऊन टाकी. हिंवाळा असो, उन्हाळा असो, तो त्याच फाटक्यातुटक्या झग्यांत आपला देह गुंडाळी व तो झगा कमरेभोंवती एका दोरीनें बांधीं. पुढें हाच फ्रॅन्सिस्कन साधूंचा सांप्रदायिक गणवेश झाला. हे फ्रॅन्सिस्कन साधू म्हणजे ख्रिस्ताची सेवापरायण शांतिसेवा ! अशी सेना कधीं कोणीं उभारली होती का ? ही अपूर्व सेवा युरोपभर दया दाखवीत, रोग्यांची शुश्रूषा करीत, अनाथांस प्रेम व आधार देत फिरत असे.

- ३ -

फ्रॅन्सिसनें सुरू केलेल्या या नव्या सेवापंथासाठीं त्याला प्रथम फक्त दोनच अनुयायी मिळाले. त्यांनीं महारोग्यांच्या एका वसाहतीजवळ एक झोंपडी बांधली व जिवंतपणीं मरणयातना भोगणार्‍या दीनवाण्या रोग्यांच्या सेवेला त्यांनीं आपणांस वाहून घेतलें. तीन वर्षांत या सेवासंघांतल्या दोघांचे बारा जण झाले. सेंट फ्रॅन्सिसचे हे जणूं लहान भाऊच होते. हे बारा जण फ्रॅन्सिसच्या पुढारीपणाखालीं पोपकडे जावयास निघाले. पोपच्या अंगचा खरा खिश्चनभाव त्यांच्या येण्यामुळें प्रकट झाला. तो विरघळला व त्यांना म्हणाला, ''ख्रिस्ताला आवडणारें हें तुमचें सेवेचें कार्य असेंच चालू ठेवा. फक्त संघटित अशा चर्चच्या व्यवस्थेआड येऊं नका म्हणजे झालें. चर्चेविरुध्द बंड नका करूं.'' फ्रॅन्सिस म्हणाला, ''आम्हांला मुळीं राजकारणांत ढवळाढवळ करावयाचीच नाहीं. तुम्ही आमच्या मार्गांत येऊं नका, आम्हीहि तुमच्या मार्गांत येणार नाहीं.''

पोपशीं असा समझौता करून फ्रॅन्सिस दरिद्री जनतेच्या दर्शनाच्या व सेवेच्या यात्रेला निघाला. तो सॅरासीन लोकांच्या पुढार्‍याकडे गेला. या वेळीं पांचवें क्रूसेड सुरू होतें. तरीहि फ्रॅन्सिस निर्भयपणें नि:शस्त्र स्थितींत सुलतानास भेटण्यास गेला. त्यानें पोपला खरा ख्रिश्चन करण्याची खटपट केली तशीच सुलतानालाहि ख्रिश्चन करण्यासाठीं खटपट केली. सुलतानानें त्याचें प्रेमानें स्वागत केलें. शेवटीं तो म्हणाला, ''साधुमहाराज, तुम्ही आपलें काम करीत राहा.''

फ्रॅन्सिस इटलींत परत आला; पोप व सुलतान धर्मयुध्द लढत राहिले.

« PreviousChapter ListNext »