Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- २ -

सेंट फ्रॅन्सिसच्या मृत्यूनंतर एकूणचाळीस वर्षांनीं म्हणजे सन १२६५ मध्यें डान्टे जन्मला. बायबल पटविण्यासाठीं जनतेला वळवूं पाहणारें इन्क्विझिशन त्याच्या जन्मापूर्वी चौतीस वर्षे निर्माण झाले होतें. डान्टेचा बाप फ्लॉरेन्स येथें वकील होता. त्याची वकिली छान चालत होती. डान्टेला लहानपणीं प्रामुख्यानें तीन गोष्टी शिकविण्यांत आल्या : — (१) आपल्या देवाची पूजा करणें, (२) आपल्या शहराशीं एकनिष्ठ राहणें, (३) आपल्या चर्चसाठीं लढणें. जगात दोन प्रकारचे लोक आहेत : — ईश्वराचे आवडते असे ख्रिश्चन व त्याचे नावडते ख्रिश्चनेतर. ख्रिश्चन धर्मी नसलेल्यांनीं ख्रिश्चन धर्म सक्तिनें वा स्वेच्छेनें स्वीकारला तर देव त्यांच्यावरहि प्रेम करील. ईश्वराच्या लाडक्यांसाठीं त्याचा स्वर्ग होता; ईश्वराच्या नावडत्यांसाठीं त्याचा नरक होता. प्रभूची प्रीति वा प्रभूचा द्वेष होईल तद्‍नुसार इकडून तिकडे वा तिकडून इकडे पाऊल टाकण्याची पायरी म्हणून स्वर्ग व नरक या दोहोंच्या दरम्यान पर्गेटरी असे. या सर्व गोष्टी डान्टेला शिकविण्यांत आल्या व त्या सर्व त्याला खर्‍या वाटल्या. त्याला त्या म्हणजे केवळ कल्पित कादंबरी असें वाटत नसे. त्याच्या मनासमोर स्वर्ग, नरक व पर्गेटरी हीं जणूं नकाशांतील निश्चित स्थानें होतीं ! माणसें मरणोत्तर या तीन जागांपैकीं कोठें तरी निश्चित जातात असें त्याला वाटे. ऑस्ट्रेलिया स्वतः कधींहि पाहिला नसतांहि भूगोल वाचणारांना खरा वाटतो, तद्वतच डान्टेला. स्वर्ग, नरक व पर्गेटरी हीं ठिकाणें वाटत. डान्टेचें भूगोलाचें अचूक पुस्तक म्हणजे बायबल !

बायबलमधील शब्दन् शब्द जसा डान्टेला खरा वाटे, तद्वतच अ‍ॅरिस्टॉटलचें लिहिणेंहि तो वेदवाक्य समजे ! मध्ययुगांतील कॅथॉलिक, प्लेटो व अ‍ॅरिस्टॉटल यांचे भक्त होते हें मोठें आश्चर्य होय. मध्ययुगांतील कॅथॉलिक धर्म म्हणजे बाप्तिस्मा; देवाला जणूं प्लेटोचा धर्म आहे. ख्रिश्चनांना ग्रीक तत्त्वज्ञानाचें ज्ञान मुसलमान व ज्यू यांनीं करून दिलें. अर्थात् कॅथॉलिकांनीं या बाबतींत मुसलमान व ज्यू यांचें ॠणी राहिलें पाहिजे. मुसलमानांनीं सारें ग्रीक ज्ञान अरेबींत आणलें होतें. अरेबींतून तें ज्यूंनीं लॅटिनमध्यें आणलें. रोमन कॅथॉलिकांना सुसंस्कृत व प्रगल्भ अशा एकच भाषा समजे, ती म्हणजे लॅटिन. डान्टेनें अ‍ॅरिस्टॉटलचा भाषांतराच्या द्वारेंच अभ्यास केला. पुष्कळदां तो अ‍ॅरिस्टॉटलच्या अर्थाचा अनर्थहि करी. ग्रीकमधून अरेबीच्याद्वारां लॅटिनमध्यें आलेलें भाषांतराचें भाषांतर वाचूनच डान्टे ग्रीक विचारांशीं परिचित झाला होता.
अ‍ॅरिस्टॉटल व प्लेटो यांच्यापासून डान्टे शिकला कीं, आत्मा ईश्वरापासून खालीं संसारांत आला असून पुन: ईश्वराकडे—माहेराला-जाण्यासाठीं सदैव धडपडत असतो. ''आकाशांतून पडणारें पाणी ज्याप्रमाणें बाष्प होऊन पुन: आकाशाकडे जातें तद्वतच या आत्म्याचें आहे. ईश्वराजवळून खालीं आलेला हा आत्मा देहाच्या बंधनांत पडून अध:पतित होतो, त्याला देहासक्ति जडते व तो खालीं खालीं जातो. हे जीवन म्हणजे देहाच्या भुका व आत्म्याच्या क्षुधा यांमध्यें सतत चाललेला झगडा होय. आत्म्याचा आवाज व वासनांचा आवाज यांमधलें हें चिरंतन युध्द आहे. इंद्रियांना निर्भयपणें नकार द्या म्हणजे आत्मा शुध्द होत जाईल,  आत्म्याच्या आशा-आकांक्षा शुध्द होत जातील. ऐहिक सुखाचा त्याग करून दैवी, आध्यात्मिक सुखांच्या मागें लागा. या ऐहिक सुखोपभोगांतच रमला तर तुमच्या आत्म्यांवर इतकीं वैषयिक पुटें चढतील कीं, नरकाग्नींत घालूनच तीं कश्मलें जाळावीं लागतील. तीं जळल्यावरच आत्मा पुन: झगझगीत सुवर्णाप्रमाणें होईल. स्वर्गात प्रभूसमोर जाण्यापूर्वी जाळून घ्यावें लागेल.

अ‍ॅरिस्टॉटल व प्लेटो यांचें तत्त्वज्ञान याप्रमाणें मध्ययुगांतील ख्रिश्चन नीतींत मिसळून गेलें. स्वर्गनरकांचें हें तत्त्व, मानवी आत्मा आपल्याकडे ओढूं पाहणारें हें स्वर्ग व नरक यांचे तत्त्वज्ञान डान्टेच्या तरुण व संस्कारक्षम मनावर खोल बिंबविलें गेलें होते. ग्रीक तत्त्वज्ञान व कॅथॉलिक धर्मशास्त्र यांचा त्यानें पुरापुरा अभ्यास केला होता, त्यानें विज्ञानाचें ज्ञान बायबलामधूनच घेतलें होतें. ज्या जगांत तो राहत होता, त्याची फारशी माहिती त्याला नव्हती. त्याचें या जगाचें ज्ञान जवळजवळ शून्यच होतें. पण ज्या जगांत मरावयाला तो जाणार होता त्याचें ज्ञान आपणास भरपूर आहे असें त्याला वाटत होतें. स्वर्गाची राजधानी, अर्थात् सोन्याचें जेरुसलेम शहर, तद्वतच नरकाची राजधानी डिस या दोहोंचीहि माहिती त्याला तो राहत असलेल्या फ्लॉरेन्स शहराच्या माहितीपेक्षां अधिक होती.

« PreviousChapter ListNext »