Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ६ वें
नवयुगाचे तीन पुरस्कर्ते :
पेट्रार्क, जोहान्स हस, जॉन बॉल

- १ -

प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींचा ख्रिश्चन जगांत झालेला पुनर्जन्म म्हणजे नवयुग असें सर्वसाधारणपणें समजण्यांत येतें. चौदाव्या शतकांत केव्हां तरी युरोपियनांस मातींत गाडलेलें सौंदर्य आढळलें. ते तें शोधूं लागले. उत्खनन सुरू झालें. ग्रीक लोकांनीं तयार केलेले अप्रतिम पुतळे उपलब्ध झाले. पुन: एकदां या अप्रतिम शिल्पवस्तू निळ्या नभाखालीं नीट मांडून ठेवण्यांत आल्या. जुन्या मठांतील ग्रंथालयें धुंडाळण्यांत येऊं लागलीं. जुन्या कचर्‍यांत, गळाठ्यांत, रद्दींत रत्यांचें संशोधन होऊं लागलें. धुळीनें भरलेल्या कपाटांत, पेट्यांत वगैरे पुस्तकें सांपडूं लागलीं. एसचायल्स, प्लेटो, अ‍ॅरिस्टोफेन्स, सिसरो, होरेस, ल्युक्रेशियस, इत्यादी थोर आचार्यांचे ग्रंथ मिळाले, ग्रीक लोकांच्या हास्याचा, आनंदाचा व विनोदाचा ध्वनि चौदाव्या शतकांत पुन: युरोपच्या कानावर आला. गंभीर व चंबूसारखें तोंड करणारें सुतकी युरोप पुन:एकदां हंसायला व विचार करायला शिकलें. युरोपीय जनता दुसर्‍या देशांकडे, जातींकडे व काळांकडे पाहूं लागली, तिचें डोळे उघडलें, संकुचित, बंद मनें जरा मोठीं झालीं, उघडलीं. चौदाव्या शतकांतील युरोपियन लोक आपल्या उच्च शिक्षणासाठीं सार्‍या जगांतील ज्ञान घेऊं लागले. त्यांनीं सार्‍या जगाचें जणूं विद्यापीठच बनविलें ! चिनी लोकांपासून ते छापण्याची कला व कागदांचा उपयोग शिकले, अरबांपासून बीजगणित व वैद्यक शिकले व प्राचीन ग्रीकांपासून तत्त्वज्ञान व काव्य शिकले. प्राचीन लोकांचे देव पुन: एकदां मानवांत वावरावयाला लागले, मानवांशीं हंसावयाला, खेळावयाला व बोलावयाला आले. पुढच्या जन्मांतील सुखासाठीं—अनिश्चित अशा भविष्य काळांतील सुखासाठीं—ताटकळत बसण्यापेक्षां या जगांतच प्रत्यक्ष सुख कसें मिळवावें हें ते सांगूं लागले.

बहुतेक इतिहासांत नवयुगाचें हें अशा अर्थाचें चित्र बहुधा आढळतें व तें फारसें खोटे असतें असेंहि नाहीं; पण तें अपुरें असतें. झोंपीं गेलेल्या युरोपीय हृदयांत प्राचीनांचें ज्ञान-विज्ञान पुन: जिवंत झालें येवढाच नवयुगाचा अर्थ नव्हता. नवयुग हें त्रिविध बंड होतें :— (१) अज्ञानाविरुध्द, (२) असहिष्णुतेविरुध्द, (३) छळ व जुलूम यांविरुध्द. अज्ञानाविरुध्द बंडाचा झेंडा पेट्रार्क नामक पंडितानें उचलला; असहिष्णुतेविरुध्द  झेंडा धर्मोपदेशक जोहान्स हस यानें उचलला; छळ व जुलूम यांविरुध्द झेंडा प्रसिध्द चळवळ्या जॉन बॉल यानें उचलला. या तिघांचें जीवन थोडक्यांत पाहूं या. नवयुग या नांवानें ज्ञात असलेल्या क्रान्तीमध्यें जे तीन प्रवाह होते ते या तिघांनीं उचलून घेतले होते.

« PreviousChapter ListNext »