Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 24

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पेट्रार्क जरी अवलियासारखा-संन्याशासारखा-राहत होता, तरीहि त्याला ही स्तुति आवडली नाहीं असें नाहीं. ही स्तुति लाभावी म्हणून त्यानें खटपट केली, प्रयत्न केले. तो सर्व प्रकारच्या संगीताचा भोक्ता होता. टाळ्यांचें तद्वतच स्तुति करणार्‍या जिभेचेंहि संगीत त्याला आवडे. आपल्या लिखाणांत जरी तो अधिकार्‍यांची टिंगली करी तरी प्रत्यक्ष वागतांना मात्र तो त्यांच्याशीं सौम्यपणानेंच नव्हे तर जरा अदबीनेंहि वागे. अधिकारीहि त्याच्या साहित्यिक टिंगलीबद्दल स्मित करीत; पण खासगी वागणुकींत तो नमून वागे, म्हणून ते त्याचा मानसन्मान व उदोउदो करीत. पेट्रार्कचा देह, तसाच आत्मा कॅथॉलिक चर्चच्या प्रेमळ व वत्सल बाहुपाशांत सुरक्षित असेतोंपर्यंत त्याचें मन प्राचीनांच्या पुष्पवाटिकेंत हिंडत फिरत राहिलें तरी चिंता नाहीं असें ते अधिकारी म्हणत.

त्याची ज्ञानाची तहान व रोम वाङ्मयावरील त्याची उत्कट प्रीति या गोष्टी वगळल्या तर पेट्रार्क धोकेबाज नव्हता. तो सनातनी, समतोल वृत्तीचा व शहाणा गृहस्थ होता. तो इतका साळसुद व भरंवसा ठेवण्यालायक गृहस्थ होता कीं, तो कांहीं वेडेंवांकडें करील अशी कोणाला शंकाहि येण्याची शक्यता नव्हती. पॅरिसच्या विद्यापीठानें त्याला प्राध्यापक म्हणून बोलाविलें; पण नेपल्सचा राजा रॉबर्ट याच्या अध्यक्षतेखालीं व्याख्यानमाला गुंफण्यासाठीं आलेलें आमंत्रण त्याला अधिक महत्त्वाचें वाटलें. विद्यापीठांतल्यापेक्षां प्रासादांतला मानसन्मान त्याला अधिक आकर्षक वाटला. नेपल्सच्या वाटेवर रोम शहरीं त्याचें सार्वजनिक स्वागत करण्यांत आलें. त्याला विजयमाला अर्पण करण्यांत आली. श्रेष्ठतम कवि म्हणून त्याचा गौरव करण्यांत आला. तो अर्वाचीन जगांतील पहिला राजकवि होय.

त्याच्या आयुष्यांतील शेवटच्या भागांत तर त्याच्यावर मानसन्मानांची नुसती वृष्टि झाली ! परंतु या काळांत त्याच्या वांट्यांस दु:खेंहि आलीं. इ.स. १३४८ मध्यें त्याची स्फूर्तिदेवता लॉरा ही मेली. युरोपांतील काळ्या प्लेगनें तिचा बळी घेतला. प्लेगनें सर्वत्र कहर उडविला होता. थोड्या वर्षांनी याच रोगाला त्याचा एकुलता एक मुलगाहि बळी पडला. याच साथींत त्याचे कांही जिवाभावाचे मित्रहि मेले. तो पुन: एकदां पुस्तकांत शिरला; त्यानें वाङ्मयांत बुडी मारली. तो असा एक आश्रम काढूं इच्छीत होता कीं, तेथें ख्रिश्चन धर्मांतील ज्ञानवैराग्यांबरोबरच प्राचीन काळांतील मुक्त विचार व मोकळी संस्कृति यांचीहि पूजा-अर्चा व्हावी, प्राचीन धर्म व ख्रिस्ती धर्म दोन्ही तेथें भेटूं व एकत्र नांदू शकावे. पण हें स्वप्न अशक्य आहे असें त्याला आढळून आलें व त्यानें तो नाद सोडून दिला. त्या वेळेस सर्व जगभर क्रांतिकारक वारे वाहूं लागले होते. थोडा वेळ पेट्रार्कहि या क्रांतीच्या वातचक्रांत सांपडला, पण थोड्याशा अनुभवानंतर तो क्रांतीच्या लाटांतून बाहेर पडला. त्याचा आत्मा प्रत्यक्ष सृष्टींत, आसपासच्या प्रत्यक्ष जीवनांत रमत नसे, तर काव्यांत रमत असे, वाङ्मयांत विहरत असे. १३७४ च्या १८ व्या जुलैला तो मरण पावला. मरतांना त्यानें आपलें पवित्र मस्तक एका पुस्तकाच्या उशीवर ठेवलें होतें.

« PreviousChapter ListNext »