Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वर्गांतील देवदुतांशीं व आत्म्यांशीं बोलतां येतें अशा प्रकारच्या चमत्कारमय कथा छोटी जोन ऑफ आर्क आपल्या आईच्या तोंडून नेहमीं ऐके. तिची आई धर्मशील होती. जोनला लिहितां-वाचतां येत नव्हतें. तें तिला शिकविण्यांत आलें नव्हतें. धार्मिक दन्तकथा व पर्‍यांच्या गोष्टी हेंच तिचें शिक्षण. तिला या गोष्टी खर्‍या मानावयाला शिकविण्यांत आलें होतें. फ्रेंच इतिहासकार मायचेलेट म्हणतो, ''चर्चच्या भिंतींजवळ ती जन्मली होती. चर्चमधील घंटांच्या नादावर ती पाळण्यांत आंदुळली जाई, झोंपविली जाई. तिचें मन व तिची बुध्दि हीं दन्तकथांवर पोसलीं गेलीं होती. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे तीच एक जिवंत दन्तकथा बनली. तिच्या बापाच्या घराजवळ जंगल होतें. त्या जंगलांत पर्‍या राहतात असें मानण्यांत येई. वर आकाशांत नाचणार्‍या मेघमालांवर किंवा तेजस्वी रथांवर बसून देवदूत उडत्या-पळत्या मेघांमधून जात आहेत असे तिला दिसे. जेव्हां तिचा बाप शेतांत काम करीत असे आणि आई घरकामांत मग्न असे, तेव्हां उंबर्‍यावर बसून ती गावांतील सारे आवाज ऐकत राही. सर्वांचा मिळून एक संमिश्र, संमीलित आवाज होई. अतिमधुर व स्वप्नमय अशी ती अस्पष्ट वाणी तिला गुंगवी. 'माझ्याशीं बोलणार्‍या देवदूतांचाच नव्हे का हा आवाज ? हो, तोच.' असें तिला वाटे. परलोक व इहलोक यांची सीमान्त-रेषा कोठें, कशी, कोण काढणार ? स्वर्ग व पृथ्वी जणूं एकमेकांशीं मिळूनच गेलीं आहेत व शेजारचीं माणसें रस्त्यावर एकत्र येऊन भेटतात, बोलतात, त्याप्रमाणे स्वर्गीय देवदूत व मानव एकमेकांस भेटूं शकतील, परस्परांशीं बोलूं शकतील असें तिच्या बालनिर्मळ कल्पनेस वाटे. स्वयंपाकघरांतून आईनें हांक मारणें जितकें साहजिक तितकेंच देवदूतांनीं बोलावणें वा हांक मारणेंहि साहजिक असून त्यांत चमत्कार वगैरे कांहीं नाहीं असें तिला वाटे. इतकेंच नव्हे तर उलट देवदूत देवाच्या या पृथ्वीवरील लेंकरांबरोबर कधीं बोलत नाहींत असे तिला कोणीं सांगितलें असतें तर तो मात्र तिला चमत्कार वाटला असता. थोडक्यांत सांगावयाचें तर जोन अशा जगांत जगत होती कीं, तेथें सत्य व असत्य, खरें व काल्पनिक यांत फरक करणें तिला अशक्यप्राय होतें. देवदूत आपणांस भेटावयास येऊं शकतील व आपणांसहि त्यांना भेटण्यासाठीं वर नेलें जाणें शक्य आहे असें तिला वाटे.

ती अशा काल्पनिक पर्‍यांच्या सुंदर जगांत, स्वत:च्या कल्पनारम्य जगांत जगत होती. तिच्या या जगांत प्रत्यक्ष सृष्टींतील एकच कुरुपता होती, एकच दुष्ट गोष्टीचा डाग होता व ती म्हणजे इंग्रजांनीं चालविलेली लढाई होय. फ्रेंच लोक इंग्रजांना 'देवाचा शाप' म्हणत, 'नतद्रष्ट व प्रभुशापित लोक' मानीत. हे शापित इंग्रज फ्रान्सच्या दुर्दैवी राज्यावर हल्ले चढवीत होते, सारा प्रदेश उध्वस्त करीत होते;  इंग्रज टॉमी फ्रेंच शेतकर्‍यांचीं पिकें कापून नेत होते, त्यांच्या घरादारांची राखरांगोळी करीत होते, गुरेंढोरें पळवून नेत होते. कधीं कधीं मध्यरात्रीं आसपासच्या गांवांहून आश्रयार्थ येणार्‍या अनाथ स्त्रीपुरुषांच्या व मुलांबाळांच्या आक्रोशानें ती जागी होई. एकदां तिच्या आईबापांसहि या लुटारुंपासून रक्षणार्थ पळून जावें लागलें. जेव्हा ती आईबापांसह परत आली तेव्हा त्यांना काय आढळलें ?—सारा गांव बेचिराख झाला होता, जोनचें घर लुटलें गेलें होतें, चर्चची होळी शिलगलेली होती !

« PreviousChapter ListNext »