Bookstruck

मध्ययुगांतील रानटीपणा 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तिनें आठ हजार सैन्य उभें केलें. त्या काळांत आठ हजार सैन्य म्हणजे कांही अगदींच लहान नव्हतें. हें सैन्य बरोबर घेऊन ऑर्लीन्स शहराला वेढा घालणार्‍या इंग्रजांवर तिनें चाल केली. हिमधवल चिलखत घालून व काळ्याकाळ्या घोड्यावर स्वार होऊन सैन्याच्या अग्रभागीं चालणार्‍या या तरुणीची धीरोदात्तता, तशीच निर्भयता, पाहून जनता चकित झाली. तिनें तरवार व कुर्‍हाडी बरोबर घेतल्या होत्या. तिच्या हातांत एक श्वेत ध्वज होता व त्यावर देवांचीं आणि देवदूतांचीं रंगीत चित्रें काढलेलीं होतीं. ती त्यांना स्वर्गातून उतरलेली अभिनव वीरांगना भासली. पण ती स्वभावानें युध्दप्रिया नव्हती. लढल्याशिवाय इंग्रजांना फ्रान्समधून घालवून देतां आलें तर किती छान होईल असें तिला वाटत होतें. तिनें ''मी आपल्या हातांतल्या तरवारीनें कोणासंहि मारणार नाहीं'' अशी प्रतिज्ञा केली होती. ऑर्लीन्स आल्यावर ''तुम्ही येथून जा'' असे तीन शब्दांचे पत्र तिनें इंग्रजांस लिहिलें.

ऑर्लीन्सच्या लढाईचा वृत्तान्त सर्वांस माहीतच आले. जोननें शेवटीं इंग्रजांवर जय मिळविला. तो विजय म्हणजे चमत्कार नव्हता. इंग्रजांचा सेनापति टाल्बॉट शूर पण मतिमंद होता. त्याचें सैन्यहि दोनतीन हजारच होतें व त्यांत पुष्कळ फ्रेंचहि होतें. हें दोनतीन हजार सैन्य आसपासच्या किल्लेकोटांच्या रक्षणार्थ अनेक ठिकाणीं पांगलेलें होतें. हे किल्ले ऑर्लीन्सच्याभोंवतीं होते. या पांगलेल्या सैन्यांत दळणवळण नसल्यामुळें जोनला आपल्या संरक्षक सैन्यासह ऑर्लीन्स शहरांत प्रवेश करतां आला. फ्रेंच व इंग्रज दोघांसहि जोनचें सैन्य संस्फूर्त वाटे. त्यांचा सेनानी जोन नसून जणूं प्रत्यक्ष मायकेलच होता असें त्यांना वाटे. मग फ्रान्समधून इंग्रजांना हांकून देण्यासाठीं अवतरलेल्या या मायकेलच्या हल्ल्यासमोर कोण टिकणार ? अर्थातच इंग्रजांचा पुरा मोड होणार ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होती.

फ्रेंच सैनिक इंग्रज सैनिकांसारखेंच दुष्ट व हलकट होते. युध्दाच्या उदात्ततेचें काव्य त्यांच्याजवळ नव्हतें. युध्द म्हणजे फायद्याचें, आनंदाचें काम असेंच त्यांनाहि वाटे. चांचांप्रमाणें किंवा डाकूंप्रमाणें त्यांनाहि युध्द ही एक लुटालुटीची बाब आहे असेंच प्रामाणिकपणें वाटे. शिपाई सभ्य असणें वा सद्‍गृहस्थ असणें ही गोष्ट केवळ अशक्य आहे असें ते प्रांजलपणें कबूल करीत. युध्द हा त्यांचा धंदा होता व त्या धंद्याला अनुरूप असे उघड उघड पशुत्वाचे प्रकार करण्यास ते मागेंपुढें पाहत नसत. ऑर्लीन्स येथील जोनच्या सैन्याचा सेनापति ला हायर एकदां म्हणाला, ''ईश्वर सैन्यात दाखल झाला तर तोहि दुष्ट व नीच बनल्याशिवाय राहणार नाहीं.''  पण अदृश्य देवदूतांनीं युक्त अशी जोन तेथें असल्यामुळें—तिच्या अस्तित्वामुळें—त्या सैनिकांतहि जरा पावित्र्य आलें. ते पवित्र शिपाई बनले. फ्रेंच सैन्यांतील शेवटच्या शिपायापर्यंत सारे खरोखरच मानीत कीं, देवदूत आपल्या बाजूनें लढत आहेत व इंग्रज सैनिकांसहि तसेंच वाटत होतें. कांही इंग्रजांना असें वाटत होतें कीं, जोनच्या बाजूनें देवदूत लढत नसून सैतान व भुतें लढत आहेत. पण एका गोष्टीची इंग्रजांना खात्री होती : ते अजिंक्य अशा सैन्याशीं लढत होते. पृथ्वीवरच्या शक्तिचा मुकाबला करण्यास इंग्रज तयार होते; पण स्वर्गातल्या वा नरकांतल्या शक्तिंविरुध्द लढण्यास त्यांना बळ नव्हतें. थोडक्यांत म्हणजे फ्रेंचांच्या सैन्याधिक्यामुळें तद्वतच दैवी शक्तिच्या भीतीमुळें इंग्रज ऑर्लीन्समधून हांकलले गेले.

« PreviousChapter ListNext »