Bookstruck

मानवजातीची जागृती 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सेंटपीटर चर्चच्या जीर्णोध्दारार्थ हीं पापमोचन-पत्रें मोठ्या गाजावाजानें विकलीं जाऊं लागली. ऐपतीपेक्षां अधिक पैसे देऊनहि शेतकर्‍यांनीं हीं चिठोरीं विकत घ्यावीं अशी जबरदस्ती त्यांच्यावर होऊं लागली. यामुळें ल्यूथरचा संताप जागृत झाला. तो धार्मिक वृत्तीचा कॅथॉलिक व डोमिनिकन पंथी होता, तरी त्याचें मन स्वतंत्र विचारांचें होतें. तो विटेनबर्ग विद्यापीठांत धर्म या विषयाचा प्राध्यापक होता. ईश्वर राजकारणांत ढवळाढवळ करणार नाहीं. तद्वतच पोपांच्या या पापमोचक पत्रांशींहि त्याचा कांहींच संबंध नाहीं याविषयीं ल्यूथर नि:शंक होता.

१५५७ सालच्या ऑक्टोबरच्या एकतिसाव्या तारखेस त्यानें तेथील किल्ल्यांतल्या चर्चच्या दारावर पोपच्या कृत्यांचा जाहीर निषेध करणारें पत्रक लावलें. ''मनुष्यांनीं केलेल्या पापांच्या बाबतींत प्रभूची जी कांहीं इच्छा असेल तिच्यांत ढवळाढवळ करण्याची शक्ति पोपला नाहीं, पोपचा असा हेतु असणें शक्य नाहीं. पोपकडून असलीं क्षमापत्रें घेण्यापेक्षां कांहीं खरींखुरीं सत्कर्मे केल्यास मात्र ईश्वराचें लक्ष वेधलें जाण्याचा अधिक संभव आहे. भाडोत्री धर्मोपदेशक बहुजनसमाजावर करीत असलेले अनन्वित जुलूम पोपला समजल्यास सेंटपीटर चर्च धुळीस मिळालें तरी चालेल, पण जनतेच्या रक्तानें व हाडांमासांनीं तें बांधणें नको, असेंच त्यालाहि नि:संशय वाटेल. ख्रिश्चन धर्मीयांनीं ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, पोप अत्यंत श्रीमंताहूनहि श्रीमंत, कुबेराचाहि कुबेर आहे; तेव्हां त्याला एकट्याला सेंटपीटर चर्च बांधून काढणें मुळींच अवघड नाहीं. गरीब श्रध्दाळू लोकांपासून पैसे उकळून त्या पैशानें हें चर्च बांधण्यापेक्षां पोपनें आपल्या स्वत:च्याच पैशानें तें कां बांधूं नये ?''

या जाहीर पत्रकाच्या शेवटीं तो म्हणतो, ''माझ्याशीं मतभेद असणार्‍यांना माझें आव्हान आहे. वाटल्यास त्यांनीं माझीं मतें व माझे मुद्दे खोडून काढावे.'' या वेळी ल्यूथर चौतीस वर्षांचा नवजवान होता.

ल्यूथरच्या आव्हानामुळें वादाचें वादळच उठलें ! पोपची सत्ता धुडकावून लावणारा हा ल्यूथर पाखंडी आहे असें भटभिक्षुक, धर्मोपदेशक, सारे म्हणूं लागले. पण जुलुमामुळें गांजलेली जनता नवीन धर्म्य बंड करणार्‍या या वीराभोंवतीं उभी राहिली व 'हा आमचा पुढारी !' असें म्हणूं लागली.

पोपला सेंटपीटरचें कॅथॉलिक चर्च बांधावयाचें होतें. त्याला विरोध करण्यास उभा राहिलेला ल्यूथर 'प्रॉटेस्टंट चर्च बांधणारा' म्हणून अमर झाला. त्याच्या मनांत नसतांहि त्याला प्रॉटेस्टंट चर्चचा पाया घालावा लागला.

पण प्रॉटेस्टंट पंथीय सुधारणेचें कारण केवळ येवढेंच नव्हतें. खरीं कारणें दुसरींच व फार खोल आणि गंभीर होतीं. या चळवळीचीं बीजें कित्येक शतकांपूर्वीच नास्तिक म्हणून समजल्या गेलेल्या लोकांकडून पेरलीं गेलेलीं होतीं. तीं नवयुगांत नीट रुजलीं; त्यांनीं मूळ धरलें व चर्चनें जुलूम केला तरी—नव्हे, चर्चनें जुलूम केल्यामुळेंच-तीं अंकुरलीं व योग्य वेळीं ल्यूथरनें केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या घोषणेच्या रूपानें फुललीं. धार्मिक स्वातंत्र्याचा आत्मा चारशें वर्षे साकार होऊं पाहत होता. ल्यूथरनें त्या आत्म्याला देह दिला; पण देह देऊन त्यानें आत्मा मारला असेंच पुढें दिसून येईल.

« PreviousChapter ListNext »