Bookstruck

मानवजातीची जागृती 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ४ -

ल्यूथर आपल्या सार्वजनिक जीवनाच्या आरंभीं दयाळू, धैर्यशाली व शहाणा होता. त्याचें धैर्य शेवटपर्यंत टिकलें; पण दया व प्रज्ञा यांनीं मात्र त्याला पुढील वादविवादाच्या गोंधळांत दगा दिला. तरुणपणीं तो परित्यक्तांना व धर्मबाह्यांना दया दाखवी. स्वत: शेतकरी असल्यामुळें तो शेतकर्‍यांचा कैवारी व मोठा मित्र होता. छळाची कटुता त्यानें स्वत: चाखली होती, त्यामुळें छळल्या जाणार्‍या ज्यूंविषयीं त्याला सहानुभूति वाटे. 'येशू हा ज्यू होता' या निबंधांत ल्यूथर लिहितो, ''ज्यू हे येशूंचे आप्तच आहेत. त्यांचें रक्त एकच आहे आणि रक्त व मांस यांची प्रतिष्ठा अधिक असेल तर आपण जितके ख्रिस्ताचे आहों त्यापेक्षां ज्यूच ख्रिस्ताचे अधिक आहेत. ...म्हणून माझें सांगणें आहे कीं, ज्यूंना आपण दयाळूपणानें वागविलें पाहिजे. पोपच्या कायद्याला न मानतां आपण ख्रिस्तानें शिकविलेला प्रेमाचा कायदाच पाळला पाहिजे. आपण ज्यूंचे मित्र होऊं या.''

पण पुढें जेव्हां शेतकरी राजेरजवाड्यांच्या जुलुमाविरुध्द बंडाची भाषा बोलूं लागले, तेव्हां पोपच्या जुलुमाविरुध्द बंड करणारा ल्यूथरच राजाची बाजू घेऊन शेतकर्‍यांना शाप देऊं लागला. त्यानें 'वरिष्ठ सत्ता प्रत्येकानें मानलीच पाहिजे' अशी गर्जना केली. पोपच्या बाबतींत निर्णय ठरविण्याचा हक्क लोकांस आहे असें म्हणणाराच ल्यूथर राजाच्या बाबतींत मात्र जनतेचा निर्णय ठरविण्याचा हक्क नाकारीत होता. राजानें कांहींहि अन्याय केला तरी त्याच्याविरुध्द बंड करणें कधींहि क्षम्य होणार नाहीं असें तो म्हणे. स्वर्गामध्यें सामाजिक न्याय स्थापण्यासाठीं तो जन्मभर धडपडला; पण पृथ्वीवर सामाजिक न्याय स्थापण्यासाठीं धडपडणार्‍या शेतकर्‍यांना मात्र त्यानें शिव्याशाप दिले. 'खुनी व लुटालूट करणारे गुंड शेतकरी' असें एक पत्रक त्यानें लिहिलें. थोर इरॅसमनें या पत्रकावर 'केवळ रानटी' असा शेरा मारला. या पत्रकांत ल्यूथर राजांना आग्रहानें सांगतो, ''हें शेतकर्‍यांचें बंड रक्तांत बुडवून टाका.'' ख्रिस्ताच्या प्रेमधर्माचा हा शेवटचा भाष्यकार लिहितो, ''राजेरजवाड्यांनो, इकडे या. हें बंड मोडावयाचें आहे. हें अराजक थांबवायचें आहे. स्टेट वांचवायचें आहे. या सारे धांवून. हाणा, मारा, भोंसका, ठार करा, गळे दाबा.'' राजेरजवाड्यांना पुन: असें प्रवचन पाजण्याची गरज नव्हती. या नवीन धर्मसुधारकापासून स्फूर्ति व संदेश घेऊन त्यांनीं शेतकर्‍यास ठायीं ठेंचलें, मारलें, हाणलें, ठार केलें आणि अल्पावधींतच हें बंड शांत केलें.

ज्यूंच्या बाबतींतहि त्याची पूर्वीची वृत्ति बदलली. ज्यूंना ते पुढें प्रॉटेस्टंट होतील या आशेनें त्यानें सहानुभूति दाखविली होती. पण आपल्याच धर्माला चिकटून राहण्याचा त्यांचा अभंग निश्चय जेव्हां दिसून आला तेव्हां तो त्यांच्यावरहि आग पाखडूं लागला. पूर्वी जसा तो शेतकर्‍यांवर तुटून पडला तसा आतां तो ज्यूंवरहि उलटला. ''ज्यूंच्या बाबतींत काय करावें ?''  असा प्रश्न विचारला असतां त्यानें जाहीररीत्या दिलेल्या उत्तरांत तो म्हणतो, ''त्यांचीं धर्ममंदिरें व त्यांच्या पाठशाळा जाळून टाका.'' जें जळणार नाहीं तें मातींत गाडून टाका. त्यांचीं घरें लुटा, बरबाद करा. त्याचीं प्रार्थनापुस्तकें, त्यांचे धर्म-ग्रंथ, सारें जप्त करा. त्यांच्या धर्मोपाध्यायांना धर्म शिकविण्याची बंदी करा. जर ते ऐकणार नाहींत तर त्यांना 'तुम्हांला ठार मारण्यांत येईल, तुमचें अवयवच्छेदन होईल' असें सांगा व तरीहि त्यांनीं न ऐकल्यास त्याच्या जिभा उपटा.'' ज्या ज्यूंनीं ल्यूथरला त्याचा देव दिला, येशू दिला, त्या ज्यूंवरच त्यानें अशी आग पाखडली ! जवळजवळ चारशें पृष्ठांचें शापपुराण त्यानें ज्यूंच्या बाबतींत खरडलें आहे.

वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी म्हणजे १५४६ सालीं ल्यूथर मरण पावला. जुलुमाविरुध्द बंड करून त्यानें सार्वजनिक जीवनास आरंभ केला, पण शेवटीं तो स्वत:च जुलूम करणारा झाला. प्रो. जॉर्ज फूट मूर हा आपल्या 'धर्माचा इतिहास' नामक ग्रंथाच्या दुसर्‍या भागांत लिहितो, ''मध्ययुगांतील चर्च ज्याप्रमाणें सत्ता व मत्ता यांमागें उभें असे, त्याचप्रमाणें ल्यूथरचा धर्महि सत्ताधीशांना व मालदारांना आशीर्वाद देण्यासाठींच उभा राहिला. बायबलांतून इहलोकीं व परलोकीं नवीन आशा मिळेल असें ज्यांस वाटत होतें, त्यांच्या आशेची ल्यूथरनें राखरांगोळी करून टाकली !''

हेंच दुसर्‍या शब्दांत सांगावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, ख्रिस्तानें पददलितांच्या रक्षणासाठीं धर्म स्थापला; पण ल्यूथरनें मात्र पूर्वीच्या कित्येक कॅथॉलिकांप्रमाणेंच पददलितांवर जुलूम करणारा धर्मच स्थापण्याचा यत्न केला. रूढ ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्मापासून अद्याप फार दूर होता.

« PreviousChapter ListNext »