Bookstruck

मानवजातीची जागृती 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- २ -

मॅकिआव्हिली हा जन्मानें फ्लॉरेन्टाइन होता. युरोपांतील अनेक दरबारांत त्याला मुत्सद्देगिरीचें शिक्षण मिळालें होतें. इ.स. १५०२ ते इ.स. १५१२ पर्यंत दहा वर्षे तो फ्लॉरेन्सच्या आमरण अध्यक्षाचा—सॉडेरिनी याचा—उजवा हात होता. युरोपांतील नाटकाच्या पडद्याआड चाललेल्या भानगडी नीटपणें पाहण्याची संधि त्याला मिळाली. त्यानें फ्लॉरेन्सच्या सैन्याची पुनर्रचना केली; सॉडेरिनीचीं भाषणें तोच लिहून देई; सॉडेरिनीच्या पुष्कळशा कृत्यांबद्दलहि तोच जबाबदार होता.

लॉरेंझो डी मेडिसी यानें जेव्हां सॉडेरिनीस पदच्युत केलें, तेव्हां मॅकिआव्हिलीचा खूप छळ केला गेला आणि नंतर फ्लॉरेन्सपासून बारा मैलांवर असलेल्या एका गांवीं त्याला निर्वासित करण्यांत आलें. फ्लॉरेन्समध्यें काय काय चाललें आहे हें तो तेथून पाहूं शकत असे. पण मेडिसीच्या धोरणांत ढवळाढवळ करण्याइतका जवळ तो नव्हता. राजकारणांत प्रत्यक्ष भाग घेतां येत नसल्यामुळें यशस्वी राजकारणी कसें व्हावें याचें शिक्षण तो इतरांस देऊं लागला. राजकारणावर, मुत्सद्देगिरीवर, त्यानें अनेक पत्रकें लिहिलीं. त्यानें या पत्रकांस 'शासनविषयक कापट्य' असें नांव दिलें होतें. 'स्टेट-क्रॅफ्ट' म्हणजे मुत्सद्दी होण्यासाठीं करावें लागणारें क्रॅफ्ट किंवा कपट. युध्दाच्या कलेवर त्यानें सात पत्रकें लिहिलीं, विवाहावर एक उपरोधक निबंध लिहिला, एकदोन सैतानी नाटकें लिहिलीं, पुष्कळशा विषय-लंपटतेच्या यथार्थवादी गोष्टी लिहिल्या. त्यानें नीतीची उलटापालट केली व रानवटांच्या जगाला बिनदिक्कत सांगून टाकलें कीं, अप्रामाणिकपणाचें धोरण यशस्वी होतें; तोच सर्वोत्तम मार्ग ! या जागांत पुढारीपणासाठीं निर्दय झगडा चालेला असतो. अशा या जगांत उदात्ततेला व उदारतेला, सहृदय व सुसंस्कृत अभिरुचीला वाव आहेच कोठें ? युध्द आणि तें प्रामाणिकपणें करणें ही गोष्ट हास्यास्पद होय. तो म्हणतो, ''युध्दांत प्रामाणिकपणा कधींहि नसतो. जें जें कराल तें तें चांगलेंच असतें. जर शत्रूला भोंसकावयाचें असेल तर निदान त्याच्या पाठींत भोंसकण्याइतकें तरी शहाणे व्हा.''

मॅकिआव्हिलीचें शाठ्यनीतीचें जगप्रसिध्द 'प्रिन्स' म्हणजे 'राजा' हें होय. या पुस्तकांत त्यानें आपले विचार स्पष्टपणें मांडले आहेत. हें पुस्तक म्हणजे जुलुमाचें क्रमिक पुस्तकच म्हणाना ! मॅकिआव्हिली हा सीझर बोर्जियाचा चाहता होता. आपल्या 'राजा' या पुस्तकांत मोठेपणाचा आदर्श म्हणून त्यानें सीझर बोर्जिया पुढें ठेवला आहे. बोर्जियाप्रमाणें सर्व राजांनीं वागावें असें तो सांगतो. एकाद्या नवीन स्टेटचा कारभार हातीं घ्यावयाचा असेल, आपलें प्रभुत्व त्या राष्ट्रावर ठेवावयाचें असेल, तर बोर्जिया वागतो तसेंच वागलें पाहिजे असें तो सांगतो. त्याला प्रजेच्या कल्याणाची पर्वा नसे. राजाचा स्वार्थ कसा साधेल येवढेंच तो पाही. पंधराव्या व सोळाव्या शतकांत युरोपांतील नीति कशी होती या बाबतींत हें पुस्तक म्हणजे उत्कृष्ट टीका होय.

या पुस्तकाची नीट कल्पना यावी म्हणून त्यांतील मॅकिआव्हिलीच्या जणूं 'दहा आज्ञा'च अशीं दहा सूत्रें पुढें दिली आहेत :—
१.    स्वत:चा फायदा पाहा.
२.    स्वत:शिवाय दुसर्‍या कोणाला मान देऊं नका.
३.    साधुतेचें ढोंग करून दुष्ट आचरण करा.
४.    जें जें शक्य असेल तें तें मिळवा, घ्या.
५.    कंजूष असा.
६.    पशुवत् वागा.
७.    संधि सांपडेल तेव्हां तेव्हां दुसर्‍यांना फसवा.
८.    शत्रूंना ठार कराच करा, पण जरूर तर मित्रांनाहि.
९.    —(दुसर्‍यांशीं वागतांना) दया दाखविण्यापेक्षां शक्ति दाखवा.
१०.    युध्दाशिवाय कशाचाहि विचार करूं नका.

« PreviousChapter ListNext »