Bookstruck

मानवजातीची जागृती 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ५ वें
अहिंसक, युध्द-प्रतिकारी जॉर्ज फॉक्स
- १ -

इंग्लंडमधील लीस्टरशायर परगण्यांतल्या एका खेडेगांवांत तो वेडा माणूस राहत असे. तो एका चांभाराजवळ उमेदवार म्हणून होता. पण १६४३ च्या जुलै महिन्यांत मूसा, येशू, बुध्द, यांच्याप्रमाणें तो पच्कीर होऊन सत्यशोधार्थ बाहेर पउला. या साहसी सत्यशोधकाचें नांव जॉर्ज फॉक्स. त्याची जीवनांत निराशा झाली होती. सभोंवतालचे जीवन पाहून तो दु:खी होई. आपण या जगांतले नाहीं असेंच जणूं त्याला पदोपदीं वाटे. या जगांतील पशुता व हालअपेष्टा तो समजूं शकत नसे. त्या वेळीं युरोपांत त्रिंशद्वार्षिक युध्द जोरांत चालू होतें. इंग्लंडांत पहिला चार्लस शत्रूंचीं मुंडकीं उडवून तीं कुंपणावर लावून ठेवीत होता. अखेर पार्लमेंट संतापून राजाच्या मुंडक्याची मागणी करूं लागलें. राजकारणाची वा लढाईची यत्किंचितहि आवड नसणारांना घरांतून ओढून आणून सक्तीनें लढावयाला लावण्यांत येई. घरीं असणारांवर अपरंपार कर बसवून त्यांना भिकारी करण्यांत येई. वेळच्या वेळीं कर न देणार्‍यांना तुरुंगांत डांबण्यांत येई व त्यांच्या घरांतलें सामान जप्त करण्यांत येई. एकदां तर राजाचे हे दूत एका घरांत घुसून लहान मुलाचें दूध ठेवलेलें भांडें, त्यांतील दूध ओतून, घेऊन गेले. राजे व सेनापती यांच्यापुढें मानवजात मेटाकुटीस आली होती. रोगग्रसत शरीर हळूहळू मरणाकडे जातें तद्वत् मानवसमाज मरणाकडे जात होता.

वीस वर्षांचा तरुण जॉर्ज जगांतल्या या दु:खांवर कांहीं उपाय सांपडतो का, हें पाहण्यासाठीं आपला धंदा सोडून बाहेर पडला. ईश्वराच्या इच्छेनें ज्ञान आपणांस आहे, मानवांना कशाची जरुरी आहे हें आपणांस कळतें असा आव आणणार्‍या धर्मोपदेशकांकडे तो गेला व 'माझ्या सत्यशोधनांत मला मदत करा' असें त्यांस म्हणाला. पण त्यांनीं त्याची टिंगल उडविली ! एक म्हणाला, 'लग्न कर म्हणजे सारें समजेल.' दुसर्‍यानें उपदेशिलें, 'युध्दांत जा व युध्दच्या रणधुमाळींत मनाचा सारा गोंधळ विसरून जा.' तिसरा म्हणाला, 'मानवजातीच्या चिंतेचा हा तुम्हांला जडलेला रोग बरा होण्यासाठीं कांही औषध वगैरे घ्या.' कोणीं सुचविलें, 'तंबाकू ओढूं लागा !' कोणीं म्हटलें, 'धार्मिक स्तोत्रें वगैरे म्हणत जा.'  जॉर्ज सांगतो, ''देवाचे हे जे पाईक, त्यांतील एकानेंहि माझें मन कां अशान्त आहे तें समजून घेण्याची खटपट केली नाहीं; मानवजातीचीं दु:खें काय आहेत तें एकानेंहि समजून घेतलें नाहीं. ते सारे पोकळ पिशव्या होते.''  फॉक्सच्या अनुभवास आलें कीं, सुशिक्षित मनुष्य विचार करणारा असतोच असें नाहीं. त्या वेळेपासून त्याला नाना भाषा बोलणार्‍या सुशिक्षित पढतमूर्खांबद्दल व पोकळ धर्मप्रचारकांबद्दल सदैव तिरस्कार वाटे.

चार वर्षे तो स्वत:च्याच मनांत विचार करीत होता. आणि स्वत:च्या मनाला त्रास देणार्‍या प्रश्चांचें उत्तर त्याला मिळालें. जगांतील दुखांचीं मुख्यत: तीन कारणें आहेत असें त्याला दिसलें :-

१.    ख्रिश्चन राष्ट्रांना ख्रिश्चन धर्माविषयीं कांहीं कळत नव्हतें.
२.    स्वत:ला पुढारी म्हणविणारे फार अहंमन्य असतात व या पुढार्‍यांच्या पाठोपाठ जाणारे फारच नेभळट असतात.
३.    जगांतील निर्दय युध्दंमुळें मानवजात जणूं मरण-पंथास लागली आहे.

« PreviousChapter ListNext »