Bookstruck

मानवजातीची जागृती 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

क्रॉम्वेल क्वेकरचा उपदेश विसरला. त्याच्या घरांत तर कधीं शांति नांदलीच नाहीं, पण त्याचीं हाडेंहि थडग्यांत सुखानें राहूं दिलीं गेलीं नाहींत ! त्याच्या मृत्यूनंतर पुन: राजशाही सुरू झाल्यावर वेस्ट मिन्स्टर ऍबेमधून त्याचें थडगें उकरून त्याचा देह बाहेर काढण्यांत आला व त्याला पचंशीं देण्यांत आलें. नंतर छिन्नविच्छिन्न करून तो देह एका कुंभाराच्या शेतांत फेंकून देण्यांत आला.

जो क्रॉम्वेल तरवारीच्या जोरावर स्वत:ला कीर्ति व स्वत:च्या राष्ट्राला स्वातंत्र्य आणूं पाहत होता, त्याच्या जीवनाची शेवटची इतिश्री अशा प्रकारें लिहिली गेली ! त्याची क्रान्ति त्याच्या मृत्यूबरोबरच अस्तास गेली. पण जॉर्ज फॉक्सनें सुरू केलेली अहिंसक क्रान्ति अद्यापि आहे, येवढेंच नव्हे, तर ती जगभर अधिकाधिक दृढतनें व तेजानें पसरत आहे.

- ४ -

दुसरा चार्लस गादीवर आला. क्रॉम्वेलच्या कारकीर्दीत क्वेकरमंडळींवर रिपब्लिकविरुध्द कट केल्याचा आरोप करण्यांत आला होता, आतां त्यांच्यावर राजाविरुध्द कट केल्याचा आरोप करण्यांत आला. विद्यार्थी, धर्मोपदेशक, मेरी, इंग्लंडचे मॅजिस्ट्रेट, सार्‍यांनाच क्वेकरांचा छळ म्हणजे गंमत, असें वाटत असे. एकदां तर पंधरा हजार क्वेकर तुरुंगात होते. त्यांतले पुष्कळ जण तुरुंगांतच मेले. तथापि त्यांचे छळकहि त्यांना जरा भीत असत. क्वेकरांविषयीं त्यांना जरा कांहीं तरी गूढ वाटे. क्वेकर अत्याचाराची परतफेड मधुर वाणीनें करीत, अपमानाला स्मितानें उत्तर देत. त्यामुळें हे श्रेष्ठ अशा जगांत राहणारे जादूगार आहत असें केव्हां केव्हां वाटे. एकदां फॉक्सला अटक झाली तेव्हां तो उडून जाऊं नये म्हणून चिमणीच्या धुराड्याजवळहि एक रखवालदार ठेवण्यांत आला होता !

फॉक्सवर देखरेख करणारे सैनिक त्याचे धैर्य, त्याचें व्यक्तिमत्व व त्याचें विभूतिमत्त्व पाहून दिपून जात. ते त्याला म्हणत, ''तुम्ही आमच्या पलटणींत सामील व्हाल तर आम्ही तुम्हाला कॅप्टन करूं.'' फॉक्सनें शिपाई व्हावें म्हणून त्या शिपायांनीं पराकाष्ठा केली; पण त्यांना यश येण्याऐवजीं त्यांच्यांतल्याच पुष्कळांवर त्याच्या पंथाचे अहिंसक सैनिक बनण्याची पाळी आली.

- ५ -

१६६९ सालच्या ऑक्टोबरच्या अठराव्या तारखेस त्यानें स्वार्थमूर हॉल येथील न्यायाधीश फेल याच्या विधवेशीं लग्न केलें. तिचें नांव मार्गारेट फेल; ती आठ मुलांची आई होती. फेल-घराण्याशीं फॉक्सचा सतरा वर्षांचा संबंध होता. मार्गरेट मित्रसंघाची सभासद होती. क्वेकर लोकांच्या बैठकींसाठीं तिनें आपलें ऐसपैस व प्रचंड घर दिलें होतें. क्वेकर लोक तुरुंगांत होते तेव्हां ती त्यांच्यासाठीं रदबदली करी. एकदोनदा तर ती स्वत: त्याच्यासाठीं तुरुंगांत गेली होती. ती उच्च कुळांत जन्मली होती. ती सुंदर व सुसंस्कृत होती. जें जें काम ती हातीं घेई त्यांत त्यांत तिला यशच येई. ती मनांत आणती तर समाजांत श्रेष्ठपदवी व राजदरबारांत सत्कार मिळवूं शकली असती. पण बहिष्कृत जॉर्ज फॉक्सची संगति लाभावी म्हणून तिनें या सर्व गोष्टींवर लाथ मारली. क्वेकर लोकांसाठीं तिनें मानसन्मान व सुखोपभोग दूर लोटले ! फॉक्सशीं लग्न करते वेळीं तिचें वय पंचावन वर्षांचें होतें. फॉक्स शेहेचाळीस वर्षांचा होता. हें दांपत्य तुरुंगांत नसे तेव्हां दोघेहि शांततेचा संदेश देत पृथपणें हिंडत असत. एकमेकांना एकमेकांच्या संगतींत फारसें राहतां येत नसें. त्यांच्या बावीस वर्षांच्या वैवाहिक जीवनांत फार फार तर पांच वर्षे ती दोघें एकत्र राहिलीं असतील.

« PreviousChapter ListNext »