Bookstruck

मानवजातीची जागृती 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जीवनाच्या सुरुवातीला नेपोलियन नास्तिकवादाकडे झुकत होता; पण आतां तो धार्मिक झाला. धर्माशिवाय दुसर्‍या कोणत्या युत्तिच्वादानें 'आपल्या दारिद्र्यांतच समाधान माना' हें गरिबांना पटवून देता येईल बरें ?''  असें तो म्हणे. एक अफानानें आजारी आहे, तर एक भुकेनें मरत आहे, हा जगांतील भेद, ही जगांत दिसणारी विषमता मनुष्यांनीं सहन करावयास पाहिजे असेल तर, कोणी तरी असें सांगणारा हवाच कीं, 'ईश्वराचीच तशी इच्छा आहे. जगांत गरीब व श्रीमंत हे भेद असावे असा ईश्वरी संकेतच
आहे !' असें सांगितलें तरच लोक गपप बसतील. नेपोलियन ईश्वराचा भूतलावरील अधिकृत प्रतिनिधि बनला. 'दरिद्री व पददलित असूनहि प्रजेनें शांत राहावें, समाधान मानावें,' यासाठींच जणूं नेपोलियनचा अवतार होता.

इतर सर्व गोष्टींप्रमाणें त्यानें धर्माचेंहि प्रबळ लष्करी शास्त्र बनविलें व परकीयांवर हेरगिरी करण्यासाठीं परदेशांत मिशनरी पाठविले. तो म्हणे, ''आशिया, आफ्रिका, अमेरिका, इत्यादि ठिकाणीं या मिशनर्‍यांचा मला खूप उपयोग होईल; त्या त्या देशांची हकीकत मला या मिशनर्‍यांतर्फे मिळेल, त्या पाद्र्यांचा धार्मिक पोषाख त्यांचें रक्षण करील व त्यायोगें त्यांचे व्यापारी व राजकीय हेतू कोणास कळणार नाहींत.''  त्याला आतां एकाच ध्येयाचा-स्वत:च्या सत्तेचा-ध्यास लागला होता. सत्ता कोणत्या मार्गांनीं मिळवावयाची याचा विधी-निषेध त्याला नसे. मार्ग कोणताहि असो, सत्ता हातीं राहिलीं म्हणजे झालें असें तो म्हणे. जुन्या क्रांतिकारक सहकार्‍यांची 'कल्पनावादी' अशी टिंगल करून ते स्वातंत्र्य व सुधारण या ध्येयांच्या पुरस्कार करीत म्हणून त्यानें त्यांना दूर केलें. स्वातंत्र्याचा हट्टच धरून बसणार्‍यांना तो तुरुंगांत टाकी. त्याला टीकेची भीति वाटे, म्हणून तो टीकाकारांना दया दाखवीत नसे. 'सार्‍या जगाला थक्क करणें, दिपवून टाकणें' हें त्याचें ध्येय असल्यामुळें तत्सिध्दयर्थ त्यानें प्रत्येक विरोधी आवाज दडपून टाकण्याचें ठरविलें. आपण वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य दिल्यास आपली सत्ता तीन दिवसहि टिकणार नाहीं असें त्याला वाटे.

नेपोलियन एक क्षुद्र वृत्तीचा जाहिरातबाज होता. त्यानें केलेल्या युध्दांचा हेतु जगाला गुलाम करणे येवढाच नसून जगाला दिपविणें, थक्क करणें, हाहि होता. जय कोणी का मिळवीना, टाळ्या व श्रेय मात्र नेहमीं तोच घेई. तो स्वत:ची स्तुति करणारा कुत्रा होता. त्याला मोठा आवाज करणें आवडे. तो म्हणतो, 'कीर्ति व प्रसिध्दि म्हणजे काय ? जो जास्त आवाज करतो, तोच प्रसिध्द होतो. जितका अधिक मोठा आवाज केला जाईल तितका अधिक दूर तो ऐकूं जातो. कायदे, संस्था, स्मारकें, राष्ट्रें, सर्व नष्ट होतात; पण आवाज मात्र टिकतो-पुढच्या काळांत, पुढच्या युगांतहि टिकतो.''

आणि म्हणून नेपोलियन जगासमोर मोराप्रमाणें नाचत होता. तो दरोडे घालीत. निंदा करीत, फसवीत, खून करींत, वल्गना करीत व पराक्रम दाखवीत हाता. स्वत:च्या मोठेपणाचीं स्तुतिस्तोत्रें तो स्वत:च गाई. व्हिक्टर ह्यूगो म्हणतो, ''देवालाहि जणूं त्याचा कंटाळाच आला !'' तो आणखी म्हणतो, ''पुरे झाला नेपोलियन. फार झाली त्याची चव. विटलों, विटलों आतां !''

« PreviousChapter ListNext »