Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वातंत्र्याची प्रगतिपर चळवळ कोठेंहि सुरू असो, तिला त्याचा सदैव पाठिंबा असे. अमेरिकेंतील काळ्यांवरील गुलामगिरी व युरोपांतील गोर्‍यांची गोर्‍यांवरील गुलामगिरी, दोहोंचाहि तो कट्टा वैरी होता. स्त्रियांना मत असावें असें म्हणणारा तो स्त्रियांच्या हक्कांचा पहिला पुरस्कर्ता होय. आपल्या एका निबंधांत तो लिहितो, ''स्त्रीजातीवर प्रेम करा; त्यांच्याविषयीं आदर बाळगा. स्त्रियांवरील प्रभुत्वाची प्रत्येक कल्पना मनांतून काढून टाका. तुम्ही स्त्रियांहून कशांतहि थोर नाहीं, श्रेष्ठ नाहीं,'' तो स्त्री-पुरुषांच्या समान हक्कांचा व समान कर्तव्यांचा पुरस्कर्ता होता. ''नागरिक व राजकीय क्षेत्रांत स्त्रीला समान माना. ज्या ध्येयाला आपण एक दिवस नक्की जाऊन पोंचणार आहों, त्या ध्येयाकडे मानवी आत्मा स्त्री-पुरुषांच्या दोन पंखांनीं उड्डाण करीत जाऊं दे.''

एकोणिसाव्या शतकांत अत्यंत छळली गेलेलीं व सत्ताधार्‍यांच्या शिकारी कुत्र्यांकडून सारखा पाठलाग केली गेलेली व्यक्ति मॅझिनी होय. त्याच्या फोटोची प्रत युरोपांतील प्रत्येक पोलिसाजवळ होती. मॅझिनी दृष्टीस पडताच त्याला अटक करण्याचा हुकूम प्रत्येक शिपायाला दिलेला होता. तो सारख येथून तेथें हांकलला जात होता. तो कोणत्याहि देशाचा नागरिक नव्हता. तो मानवांवर फार प्रेम करी म्हणूनच ते त्याचा व्देष करीत. मेल्यावर मात्र त्याला मोठ्या थाटामाटानें मूठमाती मिळाली. त्याला ही एक प्रकारें मरणोत्तर नुकसानभरपाईच होती म्हणाना ! १८७२ सालीं तो मरण पावला. त्याच्या शवपेटीबरोबर सत्तर हजार लोक कबरस्तानांत गेले. प्रथम प्रेषितांना ठार मारावयाचें आणि मग त्यांचीं प्रेतें पुजावयाचीं ही मानवांची नेहमींचीच युक्ति आहे.

मॅझिनीच्या मृत्यृबरोबरच राष्ट्रांराष्ट्रांमध्यें प्रेमाचें व मोकळेपणाचें बंधुत्व निर्मिण्याची त्याची कल्पनाहि विरून गेली. मॅझिनीला अपयश आलें. कारण, तो पाशवी बलावर विसंबून होता. राष्ट्रांचे खून करून का त्यांना परस्परांवर प्रेम करावयाला लावतां येईल ? जगाला मॅझिनी जरूर पाहिजे; पण तो तलवार धारण न करणारा असला पाहिजे. आणि कधीं ना कधीं तो मिळेलहि. कारण, खरी गरज असली कीं ती पुरी होतेच होते.

« PreviousChapter ListNext »