Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ५ वें
आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन
- १ -

पास्कल एकदां म्हणाला कीं, क्लिओपाट्रा हिच्या नाकाच्या आकारामुळें सार्‍या जगाचें स्वरूप बदलून गेलें. त्यानंतर जवळजवळ दोन हजार वर्षांनीं इतिहासाचें सारें स्वरूप एका केंसावर आधारलेलें होतें; दुसर्‍या एकाच्या नाकावर--नाकाच्या आकारावर--इतिहास लोंबकळत होता. तो १८३१ मधील मंदीचा काळ होता. बावीस वर्षांचा धर्माभ्यासक चार्लस डार्विन बादशहाच्या गलबतांतून अवैतनिक निसर्गाभ्यासक म्हणून जाणार होता; पण गलबताचा कप्तान फिट्झूराय त्याला घेईना. त्याचें नाक पाहून शास्त्रज्ञ होण्याची पात्रता अगर त्यासाठीं आवश्य तो उत्साह त्याच्या (डार्विनच्या) ठिकाणीं असेल असें कप्तानाला वाटेना.

डार्विन या 'बीगल' नामक जहाजांतून न जाता, तर तो धर्मोपदेशक झाला असता. मानवांच्या उत्क्रांतीवरील त्याच्या युगप्रवर्तक संशोधनाला जग मुकलें असतें व या शोधामुळें इतिहास समृध्द झाला तसा झाला नसता. डार्विन वस्तुत: धर्मोपाध्यायच व्हावयाचा; पण थोडक्यांत चुकलें. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं मस्तिष्कशास्त्राचा फार बोलबाला होता; एका मस्तिष्क-शास्त्रज्ञानें डार्विनचें डोकें तपासून सांगितलें कीं, तो धर्माचा मोठा आधारस्तंभ होईल. कारण, त्याला त्याच्या डोक्यांतच धर्मशास्त्रदर्शक भाग चांगलाच वर आलेला दिसला. दहा सामान्य धर्मोपाध्यायांच्या डोक्यांतल्या भागाइतका भाग त्याच्या एकट्याच्या डोक्यांत त्या मस्तिष्कशास्त्र्याला आढळला. डार्विनचें नाक तसेंच त्याचें डोकें त्याला सरळ इंग्लंडमधील चर्चच्या सिंहासनावर नेऊन बसविणार असें दिसत असतां, मानवजातीच्या सुदैवानें कप्तानाचें डार्विनच्या नाकाबद्दलचें मत बदललें व डार्विनला 'बीगल' गलबतावर जागा मिळाली. त्यानें बायबल मिटलें, त्यांतील सृष्टिनिर्मितीच्या कल्पित कथा सोडून दिल्या व सातां समुद्रांत फिरून पशुपक्ष्यांत, फुलांफळांत, वृक्षवनस्पतींत जगाचा इतिहास पाहण्यास प्रारंभ केला. जगाच्या इतिहासावरील प्रवचनें दगडांधोंड्यांतून, नद्यांतून, वाळवंटांतून व पर्वतांतून ऐकत तो सर्वत्र हिंडला. किती मनोरंजक व सत्यमय ही जगाची कथा ! परत आल्यावर पूर्वी धर्मोपदेशक होऊं इच्छीत असलेलाच डार्विन ज्या आधारावर चर्चची उभारणी झाली होती त्या आधाराच्याच सत्यतेविषयीं शंका घेऊं लागला ! त्यानें आव्हान दिलें. अदृश्य स्वर्गाचा अभ्यास व परलोकाचा विचार सोडून देऊन तो प्रत्यक्ष पृथ्वीचा अभ्यास करूं लागला. जग एका धर्मोपदेशकाला मुकलें खरें, पण त्याला एक अत्यंत मोठा शास्त्रज्ञ लाभला.

- २ -

डार्विन व एब्राहाम लिंकन एकाच दिवशीं--१२ फेब्रुवारी १८०९ रोजीं जन्मल्यामुळें प्रोफेसर लल म्हणे कीं, लिंकननें मानवांचे देह गुलामगिरींतून मुक्त केले त्याप्रमाणे डार्विननें मानवी मन अज्ञानाच्या बंधनांपासून मुक्त केलें. १८०९ साल महापुरुषांच्या जन्मांनीं भरलेलें आहे. या वर्षी निसर्गानें मानवजातीच्या मांडीवर जणूं महापुरुषांचें ताटच वाढून आणून ठेवलें. डार्विन, लिंकन, गॉड्स्ट, मेंडेलसन, चॉपिन, पो, टेनिसन, ऑलिव्हर वेंडेल होल्म्स, एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग, या सर्वांचा जनम याच वर्षी झाला. आणखीहि कित्येक याच सालीं जन्मले असतील. यापैकीं प्रत्येकानें मानवजातीला शाश्वत सुंदरतेची व उदात्ततेची जोड करून दिली आहे, त्यांत भरपूर भर घातली आहे. डार्विननें घातलेली भरहि कांहीं कमी नव्हती.

« PreviousChapter ListNext »