Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शास्त्रज्ञांसमोर आपली उत्पत्ति मांडल्यानंतर ती छापून काढण्यासाठीं डार्विन आपलें हस्तलिखित झपाट्यानें तयार करूं लागला. २४ नाव्हेंबर १८५६ रोजीं पुस्तकाची पहिली आवृत्ति तयार झाली. पुस्तकाला ''नैसर्गिक निवडीनें प्राण्यांची उत्पत्ति किंवा जीवनार्थकलहांत अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीचें टिकून राहणें'' असें लांबलचक व अवजड नांव देण्यांत आलें होतें.

ज्या शास्त्रीय पुराव्याच्या महापुरानें ऍडम व ईव्ह यांची गोष्ट, स्वर्गांतील बाग, वगैरे सारें पार वाहून गेलें, त्याचा थोडक्यांत गोषवारा असा : या जगांत जिवंत प्राणी सारखे अमर्यादपणें वाढत असतात, पण अन्नपुरवठा अगर राहण्याची जागा या मात्र मर्यादितच असल्यामुळें सर्व सजीव प्राण्यांत जीवनार्थकलह अहोरात्र चाललेला असतो. परिस्थितीशीं झगडण्यास अधिक समर्थ असणारे टिकतात, बाकीचे मरतात. उत्क्रांतिवादी याला 'समर्थ असतात ते टिकतात' असें म्हणतात. पण आजूबाजूची परिस्थिति देखील बदलत असतेंच : समुद्र असतो तेथें जमीन होते, जमीन असते तेथें समुद्र येतो, पर्वत जाऊन त्यांच्या जागीं दर्‍या येतात, बर्फ असतें तेथेंच एकदम उष्णता पुढें येते. आजूबाजूच्या नैसर्गिक जगांत हे फरक होत असल्यामुळें प्राण्यांसहि स्वत:मध्यें व स्वत:च्या राहणींत बदलत्या परिस्थितींत जगतां यावें म्हणून फेरफार करावे लागतात. हे फरक कधीं कधीं क्रांतिकारक होतात. एका प्राण्यांतून दुसरेच प्राणी जन्माला येतात; असें करूनच ते जणूं शकतात. ज्या पध्दतीनें ही उत्क्रांति होत जाते, तिला दुसरें चांगलें नांव सांपडत नसल्यामुळें 'नैसर्गिक निवड' हें नांव देण्यांत येत असतें. नैसर्गिक निवड म्हणजे ज्या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठीं फरक करावे लागले व ते ज्यांनीं केले तेच जगावे, टिकावे, असेंच जणूं निसर्गानें ठरविलें. त्या फरकांची जगण्याला क्षम म्हणून निसर्गानेंच निवड केली व नवीन परिस्थितींत जरूर न राहिलेल्या बाबी हळूहळू काढून टाकण्याचेंहि निसर्गानें नक्की केलें.

उत्क्रांतीची उत्पत्ति थोडक्यात अशी आहे : 'जीवनाची अमर्याद वाढ होत असल्यामुळें जीवनार्थकलह सुरू असतो व त्यांत अधिक क्षम व समर्थ असणारे टिकतात, बाकीच्या प्राण्यांच्या जाती नष्ट होतात; एकींतून दुसरी उत्पन्न होते.' या उत्पत्तीप्रमाणें आपण जे अगदीं खालचे प्राणी म्हणून समजतों, त्यांच्यापासून मानव फार दूर नाहीं. त्यांचीच पुढची पायरी म्हणजेच मानवप्राणी. ही पुढची पायरी डार्विननें ''मानवाचा अवतार'' या पुस्तकांत प्रतिपादिली आहे. मानवप्राणी माकडापासून उत्क्रांत झाला या उत्पत्तीचें श्रेय वा अश्रेय सामान्यत: डार्विनला देण्यांत येत असतें; पण खरोखर पाहिल्यास डार्विननें असें काहीं एक म्हटलेलें नाहीं. त्यानें जास्तीत जास्त इतकेंच सांगितलें कीं, मानव व वानर हे एकाच पूर्वजापासून केव्हां तरी जन्मले. हा प्राचीन प्रागैतिहासिक पूर्वज आज अस्तित्वांत नाहीं. म्हणजेच वानर हा आपला आजोबा नसून भाऊ आहे. डार्विनच्या मतें प्राण्यांतील परमोच्च विकास मानवात झाला आहे. सर्वांत जास्त विकसित प्राणी म्हणजे मानव. 'समर्थांचें अस्तित्व' या कायद्याप्रमाणें त्यानें इतर प्राण्यांवर प्रभुत्व मिळविलें आहे. समर्थ व क्षम या शब्दांचा डार्विनचा अभिप्रेत अर्थ 'अति बलाढ्य किंवा अति निर्दय' असा नाहीं. खालच्या प्राण्यांत कोणीं टिकावयाचें व कोणीं नष्ट व्हावयाचें हें बलाबलानेंच (शारीरिक झटापटीनेंच) ठरतें. पण मानवांच्या बाबतींत वैयक्तिक झगडा नष्ट होऊन सर्व मानवप्राण्यांचें सामाजिक सहकार्यच संरक्षणाचें साधन बनतें. स्वार्थी आक्रमणशीलता जाऊन तिच्या जागीं हळूहळू अन्योन्य-साह्य व सहकार्य यांचें तत्त्व रूढ होतें. मानवी जीवनाला अत:पर जंगलाचा कायदा लावणें बरें नाहीं. व्यक्तीचें जीवन नीट राहावयाला पाहिजे असेल तर सर्व मानवजातीनें नीट जगावें यासाठींच खटपट केली पाहिजे. सर्व मानवांच्या जीवनार्थ झटण्यांतच व्यक्तीच्याहि संरक्षणाचा परमोत्तम मार्ग आहे, ही गोष्ट हळूहळू का होईना पण आपण शिकत आहों.

« PreviousChapter ListNext »