Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ६ वें
कृष्णवर्णीयांचा त्राता अब्राहाम लिंकन
- १ -

मानवजातीची धार्मिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याच्या कार्यक्षेत्रांत कसकशी प्रगति होत गेली हें आतांपर्यंत आपण पाहत आलों. किती तरी राष्ट्रें रानटी स्थितींतून सुधारणेच्या आसपास येत आहेत असें आपणांस दिसलें. आपल्या काळाबरोबर पुढें न जातां शेकडों वर्षे मागें रेंगाळत राहणारे, मध्ययुगीन विचारांनीं अंध झालेले व प्रगतीला अडथळा करणारे किती तरी मुत्सद्दी आपणांस अधूनमधून आढळले ! पावलें पुढें टाकीत असतांहि दृष्टि मात्र भूतकाळांतच ठेवणारे व ठेवावयास लावणारे ते प्रतिगामी मुत्सद्दी लोकशाहीच्या काळांत पुन: राजशाह्या दृढ करीत,  नवप्रकाश येत असतां दुष्ट रूढींनाच सिंहासनावर बसवूं पाहत. अंधळ्यांचे हे अंधळे नेते जगांत धूडगूस घालीत असूनहि मानवजात चुकूनमाकून का होईना, पण न्यायाच्या सहिष्णुतेच्या, उदारतेच्या व अधिक स्वच्छ आणि सुंदर विचारांच्या अधिकाधिक जवळ जात चालली आहे असें आपणांस आढळलें. आतांपर्यंत आपण आशिया व युरोप यांतच वावरलों. त्यांवरच आपली दृष्टि खिळली होती. आतां आपण अटलांटिक ओलांडून अमेरिकेंत जाऊं या व युरोपांतून आणखी पश्चिमेकडे चाललेला संस्कृतीचा प्रवाह पाहूं या.

जगांतल्या विचारहीन लेखकांनीं किती तरी वर्षे अमेरिकेची उगीचच टर उडविली आहे. अमेरिकन लोक असंस्कृत आहेत, त्यांना नीट चालरीत वा रीतभात नाहीं, ते रानटी आहेत, जुन्या जगांतील नबाबी व रुबाबी संस्कृतीच्या मानानें ते फारच मागसलेले आहेत. असें हे लेखक खुशाल लिहितात ! तें थोडेसें खरेंहि असेल; पण त्या टीकेच्या आवाजांत एक प्रकारची कुरुचि, एक प्रकारची अशिष्टता नाहीं का ? त्यांत एक प्रकारचा रानवटपणा दिसत नाहीं का ? अमेरिकेंत वसाहत करणार्‍यांना अस्तन्या वर सारून रात्रंदिवस अविश्रांत श्रमावें लागलें, जंगलें तोडावीं लागलीं. युरोपांतील आपल्या बांधवांची संस्कृति आपलीशी करून घ्यावयाला त्यांना अवसर तरी कोठें होता ? युरोपीय संस्कृतींतील सद्गुण अभ्यासावयालाच नव्हे, तर दुर्गुण उचलावयालाहि त्यांना फुरसत नव्हती. त्यांना अठराव्या शतकांतला बराचसा काळ स्वत:चें घर व्यवस्थित करण्यांतच घालवावा लागला. त्या वेळीं युरोपच दुसर्‍यांच्या घरांत लुडबुड करीत होतें. अमेरिकन जरा रानवट व आडदाड दिसले तरी ते युरोपियनांपेक्षां खास अधिक शांतताप्रिय होते. दरबारी चालीरीती त्यांना माहीत नसल्या तरी ते उगीचच कोणाच्या माना कापावयालाहि धांवत नसत. साम्राज्यवादी कवि किपिलंग युध्दाच्या वैभवाचीं गाणीं अत्यंत सुंदर व अलंकृत शब्दात गातो, तर वाल्टव्हियन ओबडधोबड वाणीनें मानवी बंधुतेचीं गीतें गातो.

एकोणिसाव्या शतकांतील प्रबल राष्ट्रांत अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें हें एकच राष्ट्र खरोखर अनाक्रमणशील राष्ट्र होतें. अमेरिकनांतहि गर्जना करणारे हडेलहप्प मधूनमधून दिसत, अगदींच दिसत नसत असें नाहीं. मेक्सिकन व स्पॅनिश युध्दांच्या वेळीं अमेरिकेनेंहि लष्करी मूठ दाखविण्याचा बेशरमपणा केलाच. जंगली रानवटपणापासून कोणतें राष्ट्र पूर्णपणें मुक्त झालें आहे ? पण विचारहीन स्वार्थांधतेचे प्रकार अमेरिकेच्या बाबतींत कधीं कधीं दिसून आले असले तरी एकंदरींत अमेरिका फारशी युध्दप्रिय होती असें म्हणतां येणार नाहीं.

« PreviousChapter ListNext »