Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

उत्तरेकडील संस्थानांना गुलामगिरीचा वीट आला. मॅसेच्युसेट्समध्यें तर १८८३ सालींच गुलामगिरी रद्द करण्यांत आली. इतरहि कांहीं संस्थानांनीं मॅसेच्युसेट्सचें अनुकरण केलें. उत्तरेकडच्यांना कळून आलें कीं, स्वातंत्र्यापेक्षां दास्यासांठींच अधिक खर्च लागतो. हेंच दाक्षिणात्यांच्याहि डोक्यांत लवकरच आलें असतें. बेंजामिन फ्रँकलिननें हें ओळखलें होतें. तो म्हणाला, ''ग्रेट ब्रिटनमध्यें कामगार जितके स्वस्त आहेत तितके आपल्या इकडे गुलामहि स्वस्त नाहींत; कोणींहि गणित करून पडताळां पाहावा. आपण गुलाम विकत घेतला त्या रकमेवरचें व्याज धरा; त्या गुलामाच्या जीविताचें इन्शुअरन्स जमेस धरा; त्याच्या प्राणांची अशाश्वती लक्षांतम घ्या; त्याला लागणारे कपडे, त्याला द्यावें लागणारें अन्न, त्याच्या आजारांत करावा लागणारा खर्च, त्यामुळें फुकट जाणारा वेळ, कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळें होणारें नुकसार (आणि कितीहि काळजी घेतली तरी, आपला फायदा नाहीं हें माहीत असल्यावर कोणता माणूस मनापासून व लक्ष देऊन काम करील ?), गुलामांनीं काम चुकवूं नये म्हणून त्यांच्यावर ठेवलेल्या अवेक्षकांचा खर्च, पुन: पुन: होणार्‍या चोर्‍यामार्‍या (गुलाम हे गुलाम असल्यामुळें व गुलाम हे चोरहि असावयाचेच म्हणून या होतच राहणार) या सार्‍या खर्चाची इंग्लंडमधील लोखंडाच्या वा लोंकरीच्या कारखान्यांतील मजुराच्या मजुरीशीं तुलना करून पाहिल्यास लक्षांत येईल कीं, येथील नीग्रोंकडून आपण कितीहि काम करून घेत असलों तरी ते इंग्लंडमधील मजुरांपेक्षां एकंदरीत अखेर महागच पडतात.''

दुसर्‍या शब्दांत हेंच सांगावयाचें तर गुलामगिरी फायदेशीर नव्हती. दक्षिणेकडच्यांना ती दरिद्रीच करीत होती. युरोपांतील राष्ट्रें हें पाहत होतीं; एकामागून एक सर्वांनीं गुलामगिरी टाकून दिली. १८६० च्या सुमारास जागांतील बहुतेक सर्व देशांत गुलामगिरी ही एक मृतसंस्था झाली होती; अमेरिकेंतहि ती मृत्युपंथास लागली होती. १८३३ सालीं ग्रेटब्रिटननें आपल्या सर्व भागांतील गुलामगिरी रद्द केली. १८२७ सालीं मेक्सिकोनें सर्वांना मुक्त केलें. फ्रान्सनें १८४८ सालीं, पोर्तुगालनें १८५८ सालीं, रशियाचा झार अलेक्झांडर यानें १८६३ सालीं सर्व गुलामांना मुक्त केलें, भू-दासांना स्वातंत्र्य दिलें. अमेरिकेंतील दक्षिणी संस्थानेंहि पुढल्या पिढींत गुलामगिरी रद्द करावयाला तयार झालीं असतीं; पण नैतिकदृष्ट्या गुलामगिरी वाईट म्हणून मात्र नव्हे, तर आर्थिक दृष्ट्या ती परवडत नव्हती म्हणून. अमेरिकन नीग्रोंचें स्वातंत्र्य दहा लाख लोकांच्या रक्तानें पवित्र करण्याची जरुरी नव्हती; हें अंतर्गत युध्द एक अनवश्यक अशी दु:खद घटना होती.

पण तत्कालीन स्वभावाप्रमाणें हें अंतर्गत युध्द टाळणेंहि अशक्य होतें. अमेरिकेंतील मोठ्यांतल्या मोठ्या मुत्सद्दयांनींहि युध्द व्हावें म्हणूनच प्रयत्न केले. आणि दु:खाची गोष्ट ही कीं, आपण काय करीत आहों हें त्यांनाहि कळत नव्हतें. यांपैकीं सर्वांत मोठा मुत्सद्दी उदात्त चारित्र्याचा पण संकुचित दृष्टीचा अब्राहाम लिंकन होय. तो थोर पण करुणास्पद पुरुष होता. युध्द होण्याला त्याचीच अप्रबुध्दता बरीचशी कारणीभूत झाली. थोडें शहाणपण त्याच्या ठायीं असतें तर युध्द होतेंच ना. पण युध्द सुरू झाल्यावर त्यानें अनुपमेय धैर्य दाखविल्यामुळें यश मिळालें व गुलागगिरी रद्द झाली.

« PreviousChapter ListNext »