Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तो दिसण्यास कुरूप होता, त्यामुळें त्याला असमाधान वाटे. त्याच्या दु:खाचें हेंहि एक कारण होतें. लोकांनीं आपलें कौतुक करावें, आपली वाहवा करावी, असें त्याला फार वाटे. तो आपल्या डायरींत लिहितो, ''मी सर्वांना माहीत व्हावा, सर्वांनीं मजवर प्रेम करावें, असें मला नेहमीं वाटे.''  पण आपणासारख्या सौन्दर्यहीनास जगांत सुख लाभणें शक्य नाहीं हें तो जाणून होता. त्याचें तोंड खरोखरच गोरिलाच्या तोंडासारखें होतें. बारीक खोल गेलेले डोळे, आंत गेलेलें खोल कपाळ, जाड ओंठ, भलें मोठें नाक, लांबलचक व मोठे कान, अशी त्याची मूर्ति होती. त्याचें शरीर कॅलिबन नांवाच्या भुताचें होतें, पण त्या शरीरांतील मन एअरीलच्या मनासारखें दैवी होतें. आपण कुरूप असल्याची जाणीव नष्ट व्हावी म्हणून त्यानें आत्महत्या करण्याचेंहि ठरविलें. पण सुदैवानें त्यानें मन पालटलें व स्वच्छंदपणें विलासी जीवन कंठून विरंगुळा मिळविण्यासाठीं तो निघाला. मृत्यूनें कायमची विस्मृति मिळविण्याऐवजी सुख-विलासानें तो आपणास तात्पुरती विस्मृति पाडूं इच्छीत होता.

आणि असें चाललें असतां एके दिवशीं रुसो त्याच्या हातांत आला. त्याला रुसोचा शोध लागला. हा शोध म्हणजे त्याला त्या वेळीं अत्यंत आवश्यक असें टॉनिकच होतें. रुसो भेटल्यावर स्वत:च्या कुरूपतेबाबत त्याला दु:ख वाटेनासें झालें व निसर्गाच्या सौंदर्याकडे त्याची दृष्टि वळली. चर्चच्या धर्माचा त्याग करून तो रुसोच्या धर्माचा उपासक झाला. टॉल्स्टॉय रुसोची देवाप्रमाणें पूजा करूं लागला. रुसोची लहानशी प्रतिमा करून साधुसंतांच्या मूर्तीप्रमाणें तो ती गळ्यांत घालूं लागला.

रुसोच्या तत्त्वज्ञानानें संस्फूर्त होऊन त्यानें 'रशियन जमीनदार' ही आपली पहिली कादंबरी लिहिली. त्याला जन्मभर पुरून उरलेला प्रश्नच त्यानें या कादंबरींत गोंविला आहे. थोर प्रेषितांचें ध्येय व बहुजनसमाजाची त्याबाबतची उदासीनता हा तो प्रश्न होय. नेखलडोव्ह नामक एक बडा जमीनदार या कादंबरीचा नायक आहे. तो विद्यापीठांतील शिक्षण सोडून शेतकर्‍यांच्या साह्यासाठीं म्हणून जातो. पण हे सारे शेतकरी कर्तृत्वहीन अशा सर्वसाधारण लोकांप्रमाणेंच असतात; तें स्वत: कांहींच  करूं इच्छीत नाहींत. 'आपलें नशीब' असें म्हणत ते पडून राहतात व आपल्या चाकोरीतून बाहेर पडण्याची इच्छाच त्यांना होत नाहीं. आपणांस झोपडणारा धनी ते जाणूं शकतात, पण दया दाखविणार्‍या धन्याशीं कसें वागावयाचें हें त्यांना समजत नाहीं. 'असला कसला हा मालक?' असेंच जणूं त्यांस वाटत असतें. ते त्याच्यापासून दूर राहतात, 'असा कसा हा बावळट ?' असें म्हणून त्याची थट्टा-टिंगल करतात. त्यानें देऊं केलेल्या मदतीकडे ते सांशकतेनें पाहतात. त्याच्याकडे ते फसव्या, लफग्या, हेरगिरी करणारा, दुष्ट, शठ, मूर्ख, अशा अनेक दृष्टींनीं पाहतात, पण आपला मित्र होऊं पाहणारा, आपला मित्र होण्यासाठीं धडपडणारा हा धनी आहे हे त्यांच्या ध्यानांत येत नाहीं.

नेखलडोव्ह निराश होतो. तो पियानो वाजवीत असतो. पण त्याला संगीताची देणगी नसते. त्याच्या बोटांना जें गाणें वाजवितां येत नाहीं तें त्याची प्रतिभा, त्याची कल्पनाशक्ति शब्दांत गुंफते. तो संगीत ऐकतो. अनेक भूतकालीन व भविष्यकालीन संमीलित ध्वनी एकमेकांत मिसळून जातात. त्याचें स्वप्न पूर्ण होतें, विजयानें नटतें.

« PreviousChapter ListNext »