Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ४ -

टॉल्स्टॉयला स्वत:चा मोठेपणा पाहावयास मिळाल्यानंतरहि बराच काळ तो जगला. आयुष्याच्या अखेरच्या दहा वर्षांत तो राजकीय, सामाजिक व नैतिक ध्येयें उपदेशीत होता, पण तीं ध्येयें या मर्त्य लोकीं कशीं अमलांत येणार ? ज्या जगात अतिमानुष लोक असतील, त्यांतच तीं मूर्त होण्याची शक्यता. तो वुध्द होत चालला तसतसा तो अधिकाधिक गहनगंभीर तत्त्वज्ञानी व बालकाप्रमाणें साधा होत गेला. १९१० सालच्या ऑक्टोबरच्या अठ्ठाविसाव्या तारखेस तो घर सोडून बाहेर पडला, तेव्हां त्याचें वय ब्याऐंशीं वर्षांचे होतें. त्याच्या अंगांत शेतकर्‍याचें कुडतें असे. त्याच्या चेहर्‍यावर वार्धक्यामुळें सुरकुत्या व वेदनांमुळें आंठ्या पडल्या होत्या. त्याची मुद्रा सौम्य पण करुण व शांत होती. बुध्दप्रमाणें परिव्राजक होऊन जगाच्या राजमार्गानें तो फिरत होता. बुध्दनें जीवन मिळावें म्हणून घराचा त्याग केला होता, तर टॉल्स्टॉय जणूं मरण मिळावें म्हणून घराबाहेर पडला होता.

एकटेंच कोठें तरी मरून पडावें, आसपास कोणी नको, असें त्याला वाटलें. त्यानें सारें जीवन दुसर्‍यांवर दया करण्यांत घालविलें, पण तो मात्र घरच्यांची दया सोडून पळून गेला ! कित्येक दिवस तो गांवोगांव भटकत होता. शेवटीं एके दिवशीं तो जो रस्त्याच्या कडेला पडला, तो पुन: उठलाच नाहीं ! एक डॉक्टर त्याच्यापाशीं आला, त्याला तो म्हणाला, ''पृथ्वीवर लाखों लोक दु:खी व आजारी आहेत, मग तुम्ही फक्त माझाच विचार कां करतां ?''  १९१० सालच्या नोव्हेंबरच्या विसाव्या तारखेस जी शांति तो आयुष्यभर मिळवूं पाहत होता, ती त्याला मिळाली. नुकतेच सहा वाजले होते व त्याचें दु:ख-भग्न शरीर शांत झालें. 'शेवटचा महामोक्ष' त्याला मिळाला. 'मृत्यु', 'धन्यतम मृत्यु' त्याला मिळाला. याच शब्दांनीं त्यानें मृत्यूला गौरविलें होतें. जग सुसंस्कृत व युध्दहीन व्हावें यासाठीं त्यानें जीवन खर्चलें; पण त्याच्या मृत्यूनंतर चारच वर्षांत सारें जग भीषण व रानटी अशा एका महायुध्दांत बुडून गेलें !

« PreviousChapter ListNext »