Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सारें जग युध्दोत्सुक झालें. 'युध्द', 'युध्द' असा आवाज सर्वत्र घुमूं लागला. प्रत्येक देशांतील हरएक तरुणास शिकविण्यांत येई कीं, दुसर्‍या देशांतील दहांना तो भारी आहे. ही लढाऊ मनोरचना ऑस्ट्रिया-जर्मनींतल्याइतकींच इंग्लंडमध्येंहि ठसविण्यांत आलेली होती. जुन्या जगांतली इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, रशिया, हीं प्रबळ राष्ट्रें १९१४-मधल्या महायुध्दासाठीं अगदी कंबर कसून तयार होतीं; खुंट्या नीट पिरगळलेल्या होत्या. डेव्हिड स्टार जॉन्सन याच्या शब्दांत सांगावयाचें म्हणजे ''युरोपचें पिस्तूल भरलेलें होतें आणि एकदम स्फोट झाला.''

- २ -

म्हणून मागील महायुध्दाला साम्राज्यशाही स्पर्धा हेंच मुख्य कारण होतें, हें क्लेमेंकोच्या कारकीर्दीवरून लक्षांत येईल. क्लेमेंकोला 'वाघ' असें नाव होतें व त्याबद्दल त्याला अभिमान वाटे. किपिलंग हा या साम्राज्यशाहीचा महाकवि होता. काळया लोकांचें ओझें गोर्‍या लोकांना कर्तव्य म्हणून वाहावें लागतें व गोरे लोक जगाचे प्रभु होण्यासाठींच जन्मलेले आहेत असें तो म्हणे. नित्शेच्या तेजस्वी लिखाणांत हेंच 'बळाचें उद्दाम तत्त्वज्ञान' भरलेलें होतें. नित्शेचें मन सौंदर्य व वेडेपणा यांच्या दरम्यान लंबकाप्रमाणें हेलकावे खात असे. नित्शे स्वत: कोमल मनाचा व प्रेमळ स्वभावाचा होता; पण त्यानें जगाला व्देषाचें व युध्दाचें उपनिषद् दिलें. झार निकोलस याच्या धोरणांत हीच साम्राज्यशाहीची उद्दामता होती. त्याची कारकीर्द ज्यूंच्या छळासाठीं व फटक्यांच्या थैमानासाठीं प्रसिध्द आहे. पण सम्राट दुसरा वुइल्यम याच्या अहंमन्य शब्दांनीं व रानवट कृतींनीं या सर्वांना रंगरूप आलें.

- ३ -

वुइल्यम होएनझोलर्न यानें एकट्यानेंच मानवजातीला युध्दांत ढकललें असें नव्हे. तो अनेक साम्राज्यवाद्यांपैकीं एक होता; पण त्याचा आवाज सर्वांहून बुलंद होता, त्याची घनगर्जना होती; जे अपराधी होते, युध्द पेटविण्याचा गुन्हा करणारे होते, त्यांत हा वुइल्यम पटकन् उमटून पडे. दुसरे गुन्हेगार आपलें पाप गुप्तपणें, मुत्सद्देगिरीच्या पडद्याआड, गाजावाजा न करतों, मोठ्या शिताफीनें करीत. त्यामुळें पुष्कळ अविवेकी इतिहासकार त्यामागील महायुध्दांतल्या माणुसकीस काळिमा लावणार्‍या गोष्टींचें खापर एकट्या वुइल्यम कैसरच्याच डोक्यावर फोडतात.

पण आपण लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, कैसर हा एकटाच कांही गुन्हेगार नव्हता. विसाव्या शतकांतला पोषाख केलेल्या, पण केवळ रानटी व अत्यंत प्राचीन काळच्या जंगली पूर्वजांप्रमाणें असलेल्या, साम्राज्यवादी लोकांचा तो एक प्रतिनिधी होता. जवळजवळ प्रत्येक देशांत असे लोक होते आणि तेच राज्यकारभार चालवीत असत, ही वस्तुस्थिति ध्यानीं धरून कैसर वुइल्यमचें जीवन आपण पाहूं या.

« PreviousChapter ListNext »