Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वुइल्यम जगभर प्रवासार्थ निघाला. लंडन, रोम, व्हिएन्ना, अथेन्स, कॉन्स्टँटिनोपल इत्यादि शहरांतून तो मिरवीत गेला. आपण किती अद्भुत पुरुष आहों हेंच जणूं तो जगाला दाखवू इच्छीत होता तो पॅलेस्टाइनला गेला व घोड्यावर बसून जेरुसलेम शहरांत शिरला. देवाप्रमाणे त्याला मिरवीत नेण्यांत आलें. त्याच्या खास प्रवेशासाठीं तेथील भिंतीला मुद्दाम नवीन दरवाजा करण्यांत आला होता. नेहमींच्या सामान्य दरवाजातून जाणें कैसरला कमीपणाचे होतें. जगांतील सर्वांत मोठें आरमार आपल्यापाशी असावें म्हणून १८९५ सालीं त्यानें इंग्लंडशीं स्पर्धा सुरू केली. तो म्हणाला, ''माझें लष्कर ज्या दर्ज्याचें आहे, त्याच पराकोटीला माझें आरमार नेल्यावांचून मी स्वस्थ बसणार नाहीं.''

आणि इतर राष्ट्रेंहि स्वस्थ बसलीं नव्हतींच. डेन्मार्क व हॉलंड यांसारखीं कांहीं राष्ट्रें सोडून दिलीं तर इतर प्रत्येक देशाच्या अंदाजपत्रकांत उत्पन्नाचा नव्वद टक्के भाग युध्दावरच खर्च होई. संरक्षक व आक्रमक दृष्टींनीं दोस्ती करण्यांत येई. इंग्लंड, फ्रान्स व रशिया यांनीं आपला एक दोस्त-संघ बनविला तर जर्मनी व ऑस्ट्रिया यांनींहि आपली गट्टी केली. ज्याच्यावर सूर्य कधींहि मावळत नाहीं, असें आपलें अवाढव्य साम्राज्य वाढविण्याचा निर्धार इंग्लंडनें केला होता. आशिया व आफ्रिका खंडांतलें आपलें साम्राज्य टिकवावयाचें व १८७० सालीं जर्मनीनें बळकावलेले अल्सेस व लॉरेन्स हे प्रांत परत घ्यावयाचे असें फ्रान्सच्या मनांत होतें. रशिया भयभीत झाला होता. वसाहतींच्या चढाईत जर्मनीची स्पर्धा पाहून त्याच्याहि तोंडास पाणी सुटलें, त्याचाहि स्वार्थ जागृत झाला. युध्द लवकर सुरू व्हावें म्हणून शक्य तें सर्व ऑस्ट्रिया व जर्मनी यांनीं केलें. कैसरला गर्व चढला होता. तो दटावीत होता, दरडावीत होता, आपल्या मोठेपणाची गर्जना करीत होता आणि महायुध्दाचा दिवस कधीं येतो याची वाट पाहत होता.

१९१४ सालीं दोन्ही पक्ष तयार झाले होते. युध्द सुरू करण्यासाठीं सारेच जण एकाद्या निमित्ताची वाटत पाहत होते. फर्डिंनंड हा ऑस्ट्रियाच्या गादीचा वारस होता. तो बोस्नियाची राजधानी साराजेव्हो येथें गेला होता. हा प्रांत आरंभीं सर्व्हियाचा होता. तो तुर्कांनीं घेतला होता व तुर्कांच्या हातून सरतेशेवटीं ऑस्ट्रियानें बळकावला होता. १९१४ सालाच्या जूनच्या अठ्ठाविसाव्या तारखेस एका देशप्रेमी सर्व्हियन विद्यार्थ्यानें साराजेव्हो येथें फर्डिंनंडचा खून केला. सर्व्हियाचा प्रदेश ऑस्ट्रियानें गिळंकृत केलेला पाहून तो विद्यार्थी चिडला होता.

ऑस्ट्रियानें जुलैच्या अठ्ठाविसाव्या तारखेस सर्व्हियाशीं युध्द पुकारलें. रशिया अशा एकाद्या संधीची वाटच पाहत होता. सर्व्हियाला मदत करण्याच्या मिषानें ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्याविरुध्द आपल्या सैन्याच्या हालचाली त्यानें सुरू केल्या. जर्मनीनें रशियाविरुध्द व रशियाचा गुप्त मित्र फ्रान्स याच्याहिविरुध्द युध्द पुकारलें. युध्दाच्या पहिल्या घोषणेंनंतर आठच दिवसांत हा वणवा सर्वत्र भडकला. युरोपांतील सर्व प्रमुख राष्ट्रें कत्तली करण्याचा गुन्हा करूं लागलीं. रक्ताचा सडा घालण्यांत आला, एक कोटि मानवांचा संहार झाला.

« PreviousChapter ListNext »