Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

न्यायाधीश ब्रूम्स्फील्डहि उदारतेंत हटणारे नव्हते. ते म्हणाले, ''तुमच्या लक्षावधि देशबांधवांच्या दृष्टीनें तुम्ही एक मोठे देशभक्त व थोर पुढारी आहां ही गोष्ट लक्षांत न घेणें अशक्य आहे. राजीय मतांच्या बाबतींत तुमच्याशीं मतभेद असणारे लोकहि तुम्ही एक उदात्त ध्येयाचे पुरुष आहां, संत आहां, असें मानतात !''

तें बंड तात्पुरतें शमलें, पण त्या अहिंसक बंडानें ब्रिटिश सरकारला हाच विचार करावयाला लावलें यांत शंकाच नाहीं. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉई म्हणतात, ''जागतिक इतिहासांत गांधींचा हा प्रयोग अत्यंत मोठा, भव्य व प्रचंड होता व तो यशाच्या अगदीं जवळ आला होता.''

१९२२ सालची ही गोष्ट. पुढें गांधीजी सुटले. आजारी असल्यामुळें त्यांना प्रत्यक्ष राजकाराणांत कांहीं वर्षे भाग घेतां आला नाहीं. ब्रिटिशांना वाटलें कीं, हिंदी चळवळ थांबली, सत्याग्रह बंद पडला, मेला. पण गांधी योग्य वेळेची वाट पाहत होते. अहिंसक असहकाराच्या प्रयोगासाठीं ते राष्ट्राला निरनिराळया रीतींनीं सारखी शिकवण देत होते. १९२९ सालीं त्यांची शक्ति पुन: आली. शत्रूंना मित्र करण्याच्या कलेचें बरेंचसें शिक्षण त्यांच्या सैनिकांना मिळालें होतें. त्यांनीं ब्रिटिश सरकारविरुध्द शेवटचें व फार मोठें बंड सुरू केलें. त्यांना पुन: तुरुंगांत घालण्यात आलें. त्याच्या साठ हजार अनुयायांनाहि तुरुंगांत डांबण्यांत आलें  पण तुरुंगांत जाण्यास-शत्रूवर हात न टाकतां स्वत: कष्ट भोगण्यास सारें राष्ट्र शिस्तींत उभें होतें. जुलुमी सरकारचा व्देष न करतां त्याचे कायदे मोडण्याला—जंगली सत्याधीशांच्या हिंसक उद्दामपणाला सुसंस्कृत लोकांच्या शांत स्वाभिमानानें उत्तर द्यावयाला—सारें राष्ट्र सज्ज होतें. तेथें साठी हजार म्हणजे वास्तविक मूठभरच लोक तुरुंगांत गेले !

हिंदी राष्ट्राचा विजय झाला. १९३१ च्या जानेवारीमध्यें गांधींना मुक्त करण्यांत आलें. ब्रिटिश सरकारनें हिंदुस्थानला स्वराज्य दिलें; पण गांधींचें पूर्ण समाधान झालें नाहीं. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य हवें होतें. आणि का हवें असूं नये ? ब्रिटिशांना हिंदुस्थानवर राज्य करण्याचा काय अधिकार ? बेकायदा आक्रमाणाच्या जोरावर ते सत्ताधीश आहेत. हिंदुस्थानांतील इंग्रज हे नेते नसून पाहुणे आहेत असे गांधीं मानीत. ते प्रसंगीं इंग्रजांचे हुकूम मानीत नसत; पण इंग्रज संकटांत पडले, त्यांना अडचण आली, तर गांधी लगेच त्यांच्या मदतीला धांवत. पाश्चिमात्यांच्या पाणचटपणाला गांधीं पौर्वात्यांच्या सुजनतेनें सुसंस्कृतपणें उत्तर दे. आपल्या सहनशीलतेनें, हालअपेष्टांनीं, दयेने, क्षमेनें, सौजन्यानें, कार्यकुशलतेनें ते इंग्रजांना सभ माणसें बनविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगीत. त्यांनीं जगाला सिध्द करून दाखविलें कीं, शास्त्रास्त्रांची युध्दें आतां जुनाट झालीं, मोठ्यांत मोठ्या लढायाहि रक्तपाताशिवाय लढतां येतात आणि प्रेम हेंच पृथ्वीवरील अत्यंत प्रभावी व प्रबळ शस्त्र होय. त्यांचें जीवितकार्य पुरें झालें आहे.

« PreviousChapter ListNext »