Bookstruck

खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दुसर्‍यांच्या प्राणांची किंमत देऊन स्वत:चें वैभव वाढविण्यास तो उत्सुक असे. त्याचें डोकें थोडे दिवस जरा ठिकाणावर होतें; पण तें पुन: बेताल होऊं लागलें. भरमसाट उद्दाम भाषा व स्वैरे महत्त्वाकांक्षा पुन: वर डोकें काढूं लागल्या. अर्वाचीन इटॉलियनांप्रमाणें तो बोलत नसून तो जणूं अखेरचा, शेवटचा रोमन नमुना दिसूं लागला. शांतिनाथ ख्रिस्ताचें नीतिशास्त्र मुसोलिनीस माहीत नव्हतें. त्या बाबतींत तो अंधळा होता. युध्ददेवाचें-त्या प्राचीन मार्सदेवाचें जुनाट युध्दनीतिशास्त्र त्याला चांगलें समजत असे. तो ओरडून सांगे, ''युध्द म्हणजे न्याय, युध्द म्हणजे उदात्तता व धीरोदात्तता, युध्द म्हणजे बंधुभावात्मक करुणा ! युध्दचा त्रिवार जयजयकार करा !'' शांतीची प्रीति असणार्‍यांची टिंगल करतांना प्राचीन रोमनांनींहि वापरली नसती इतकी अश्लील भाषा तो वापरीत असे. शांततोपासकांना तो ''मूर्खांचा व हत-पतितांचा बाजार'' असें मानत असे. येशू म्हणे, ''शांततोपासकांना पृथ्वीचें राज्य मिळेल, ते पृथ्वीचे वारसदार होतील.''  पण मुसोलिनी अट्टाहासानें सांगे, ''असल्या शांतिब्रह्मांचें पृथ्वीवरून उच्चाटनच केलें पाहिजे.''

मुसोलिनीच्या ठायीं अतिलष्करी मनुष्याची महत्त्वाकांक्षा होती, पण अलौकिक बुध्दि नव्हती. आपण अलेक्झांडर, नेपोलियन, सीझर व्हावें, असें त्याला वाटे. दुसर्‍यांच्या मुंडक्यांशीं खेळ करूं पाहणारी जी मानवप्राण्यांची कोटि आहे तींतील तो होता, पण मानवातली ही जात झपाट्यानें नष्ट होत आहे. जुलुमानें, जुलूम करणारेच शेवटीं नाश पावतात, जुलुमाची ज्वाला जुलूम करणार्‍यांनाच जाळते, त्याच भस्म करते. हिंसेवर आधारलेलें कोणतेंहि सरकार चिरंजीव झालें नाहीं. तेहतीसशें वर्षांपूर्वी परिणत-प्रज्ञ तत्त्वज्ञान्याप्रमाणें, संस्फूर्त सन्ताप्रमाणें, ऍरिस्टॉटल म्हणाला होता, ''जुलूमशाह्या अत्यंत क्षणभंगुर असतात. जुलुमांची राज्यें क्षणजीवी असतात.''

- ४ -

मुसोलिनी सीझरचीं, तर हिटलर मुसोलिनीची संक्षिप्त आवृत्ति. मुसोलिनींप्रमाणेंच 'आपण अलौकिक पुरूष आहों' असा भ्रमरोग त्यालाहि जडला. आपण मोठा कलावान् व्हावें असें त्याला वाटूं लागलें. पण साधा घरें रंगविणारा होण्याइतपतच कलेची देणगी निसर्गानें त्याला दिलेली होती, म्हणून तो चिडला. तो जगावर इतका चिडला कीं, 'या जगावर मी सूड उगवीन' अशी त्यानें जणूं प्रतिज्ञाच केली. त्याच्या दृष्ट स्वभावात विफल झालेल्या महत्त्वाकांक्षेचीं बीजें पेरलीं गेलीं, त्यांना अंकुर फुटले, फुलें-फळें आलीं. त्यांतून जन्माला आलेला विषवृक्ष म्हणजे जुलूमशाही.

आरंभापासूनच तो आडदांड होता. तो ऑस्ट्रियन डॉन क्विक्झोट होता. तो स्वत:ला 'अपूर्व पराक्रम करणारा महावीर' मानी. डॉन क्विक्झोटप्रमाणोंच आपल्या कल्पनेच्या पवनचक्कीच्या पंखांवर त्यानें आरोहण केलें, पण डॉन क्विक्झोट मानवजातीला मुक्त करण्यासाठीं स्वार झाला होता, तर हिटलर मानवजातीला गुलाम करण्यासाठीं. आपण दुर्दैवी सरदार असून सारी मानवजात आपली शत्रु आहे असें तो लेखी.

ध्येयहीन असा तो काल्पनिक शत्रूवर दांतओंठ खात भटकत होता. तो युध्दाची वाट पाहत होता. अखेर महायुध्दाची संधि आली. युध्द हाच जणूं त्यानें स्वत:चा धर्म मानला. आपण दुर्दैवी सरदार आहों व जर्मन राष्ट्र जगातील सर्व राष्ट्रांत दुर्दैवी राष्ट्र आहे असें त्याला वाटे. त्याचें व त्याच्या जर्मनीचें एकच ध्येय होतें : आपला शत्रु जें जग त्याचा नाश करणें.

« PreviousChapter ListNext »