Bookstruck

सोन्यामारुति 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दगडू : आपण अजून सारे भ्याड आहोंत. जगांतील इतर मजूर पहा. गोळीबार होत असंता ते झेंडा मिरवीत नेतात! आपणहि मरायला तयार झालें पाहिजे. आपण आपले प्राण पेरूं म्हणजे भावी पिढीला प्राण मिळतील.

बन्सी : मजुरांच्या प्राणाला कोण किंमत देतो ? कलकत्त्यांत लाख मजूर संपावर गेले. त्यांना भाकर पाहिजे होती; परंतु त्यांना गोळ्या मिळाल्या. हीं आमचीं शरीरें भाकरीसाठीं नाहींतच जणूं. शिशाच्या गोळ्या अंगांत घुसण्यासाठींच जणूं तीं आहेत !

शिवराम : असें तिळतिळ रोज मरण्यापेक्षां ध्येयासाठीं मेलेले काय वाईट ? लाल बावटा संघांत आपण सारे सामील होऊं या. अठरा पद्मे वानर उठले तर लंकेंतील रावणाचें काय चालणार आहे ? सोन्याच्या सैतानांचें काय चालणार आहे ?

खंडू : त्या आठ दिवसांपूर्वीच्या झालेल्या सभेला जे गेले होते त्यांना कामावरून काढणार आहेत. खरें खोटें कोणाला माहीत!

बन्सी : तुला कोणीं सांगितलें ?

खंडू : रहिमान म्हणत होता.

हरि : रहिमान खोटें बोलणार नाहीं. लाल झेंड्याचीं तो गाणीं गातो. आपण मजूर सारे एक असें तो म्हणत असतो. श्रीमंत आणि गरीब दोनच भेद जगांत आहेत असें तो म्हणतो. पैसा हा श्रींमंतांचा देव व कष्ट हा गरिबांचा देव. श्रीमंतांच्या पदरांत सुख, गरिबांना दु:ख. रहिमान असें बोलतो! त्यालाहि काढून टाकतील का ?

खंडू : त्याला तर आधीं. सर्वांना तो चिथावतो असा त्याच्यावर आरोप आहे. गंगारामालाहि गचांडी मिळणार आहे.

शिवराम : मॅनेजरसाहेबांचे प्राण ज्यानें मागें वांचवले तो गंगाराम ?

खंडू :  हो, त्याला काढणार आहेत.

दगडू :  हें फारच वाईट. त्याची बायको लौकरच बाळंत व्हायची आहे. आधींच ती आजारी असते. त्यांत नवर्‍याची नोकरी गेली कीं पहायलाच नको! बाळबाळंतिणीस घेऊन तो कोठें जाईल बिचारा ?

बन्सी : गरिबाला पुष्कळ जागा जायला आहेत. देवाचें घर तर मोठें आहे ? नदी आहे, डोह आहे, गळफांस आहे, रेल्वे लाईन आहे, अफू आहे.

हरि : अफुला पैसे पडतात, गळफांसाला दोरी लागते; नदी, रेल्वेलाईन हीं बरीं आहेत साधनें.

बन्सी : मागें त्या आवडीनें नाहीं का मुलें नदींत फेंकली आणि स्वत:हि उडी घेतली ?

« PreviousChapter ListNext »