Bookstruck

सोन्यामारुति 23

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शिवराम : गंगाराम! तुझ्या कुटुंबाचें कसें होईल ? तुझ्या बायकोचे तर दिवस भरत आले आहेत !

गंगाराम : पुढच्या पिढींतील लाखों आयाबहिणी मला दिसत आहेत त्यांचीं सोन्यासारखीं मुलें नीट हंसत खेळत वाढावीं म्हणून आज आपण आपल्या मुलांबाळांचे बळी दिले पाहिजेत. हिंदुस्थानांत प्रत्येक दिवशीं लाखों लहान मुलें मरत आहेत. मरणाची घंटा रात्रंदिवस वाजत आहे. म्हणे सोन्यामारुतीच्या पुढें घंटा वाजवणार! या गरिबांची हाय हाय दूर करण्यासाठीं कोण घंटा वाजवणार! या गरिबांची हाय हाय दूर करण्यासाठीं कोण घंटा वाजवणार ? या सोन्यासारख्या जीवनाची राख होऊं नये म्हणून कोण शिंगें फुंकणार ? या लाखों चालत्याबोलत्या देवांच्या मूर्ति भंगूं नयेत, मरूं नयेत, म्हणून जे आटाआटी करतात, जे घंटा वाजवितात, त्यांना हे सोन्यामारुतीपुढचे घंट्ये नास्तिक म्हणतात! लाखों भुकेकंगाल लोकांची दाद घेणारे म्हणे धर्मलंड! आणि दगडापुढें क्षणभर घांट वाजविणारे रामकृष्णांचे जसे अवतार! बगळे बेटे! भावांचे गळे कापून दगडांना शेंदूर फांशीत बसतात! भावांची घरें जाळून मंदिरांना कळस बांधीत असतात! भावाबहिणींस अन्नास मोताद करून देवांना मुकुट चढवीत असतात! आग लागो त्या दगडी धर्माला, दगडांच्या पूजेला. ही आग लावणें आपलें काम आहे. लंकादहन हें आपलें काम !

बन्सी : राम भेटूं दे म्हणजे लंकादहानास जोर येईल.

गंगाराम : रामाचे दूत आले आहेत. चला त्यांच्या पाठोपाठ. उद्यां सभेला या.

खंडू : रहिमानची आई कशी आहे ?

गंगाराम : मेली.

हरि : केव्हां ?

गंगाराम : आज सायंकाळीं.

दगडू
: अरेरे! तूं गेला होतास ?

गंगाराम : मी तिकडूनच आतां आलों.

बन्सी : म्हातारी मोठी गोड होती.

गंगाराम
: पण गोड घांस कोठें होता ? रहिमान होणार आतां पक्का आगलाव्या! त्याला काढणार हे नक्की. आईनें आपली स्वत:ची चिंता कमी केली. रहिमान मोकळा झाला. लाल बावट्याला घट्ट मिठी मारायला मोकळा झाला. दरिद्री सोन्यामारुतीच्या समोर तो प्रचंड घंटा वाजवील.

« PreviousChapter ListNext »