Bookstruck

सोन्यामारुति 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गिरणीचा भेसूर भुंगा झाला. वसंता जागा झाला. कमळांत अडकलेल्या भुंग्याप्रमाणें वसंता कळींत फिरत होता. परंतु कळीहि फुलत होती. हळूहळू पाकळ्या उघडल्या. वसंता बाहेर आला. मिलमधील धुराचे लोट वर जात होते. हजारों मजुरांच्या जीवनांच्या होळ्या ज्या तेथें होत होत्या, त्यांचा तो प्रचंड धूर होता. सूर्याचे किरण पृथ्वीवर येत होते व पृथ्वीवरचा काळाकुटट धूर वर जात होता. देव म्हणत होता, 'मी तुम्हांला प्रकाश देतों, आनंद देतों.' मानव म्हणत होता, 'मी जगाला जुलूम देतों, मरण देतों.'

वेदपुरुषाने वसंताला हांक मारली.

वसंता : मी केव्हांच उठलों आहें.

वेदपुरुष : हे दृश्य बघ! करुण कठोर दृश्य!   

वसंता : कशी माणसांची रांग चालली आहे. मरणाकडे चालली आहे. पिळवणुकीकडे चालली आहे.

वेदपुरुष : निम्में तरी आयुष्य मनुष्याचें येथें कमी होत असेल. अपार श्रम, अस्वच्छ वातावरण, आणि उपासमार !

वसंता : ती म्हातारी बाई पळत येत आहे. ठेंच लागली वाटतें तिला ?

वेदपुरुष : ठेंच पहायला तिला वेळ नाहीं. तें गरिबाचें रक्त आहे. ते स्वस्त असते. दंड होईल म्हणून ती म्हातारी पळत आहे. मृत्युहि तिच्या पाठीशीं पळत येत आहे.

वसंता : तिला आतां खरें म्हटलें तर पेन्शन दिलें पाहिजे.

वेदपुरुष : अरे, एक दिवसाची पगारी रजाहि जेथें भेंटत नाहीं, तेथें पेन्शन ? वेडा रे वेडा. कारखान्यांत लंकेंतील रावणांचे राज्य आहे समजलास.

वसंता : माझ्याने बघवत नाहीं. तिकडे पहा. अरेरे!

वेदपुरुष : काय दिसतें तुला!

वसंता : ती गरोदर बाई धांवत येत आहे.

वेदपुरुष : पोटाला नको का ? तिचा नवरा आजारी आहे. न येऊन कसें भागेल ?

वसंता : नवर्‍यानें येऊं कसें दिलें ? त्याला का दया नव्हती ?

वेदपुरुष : त्यानें तिला पुष्कळ सांगितले, परंतु तिनें ऐकलें नाहीं. आजारी पतीला खायला नको का द्यायला ? तिचें प्रेम तिला कामाला घेऊन जात आहे. तिला आईची थोरवी देणार्‍यासाठीं ती जात आहे.

« PreviousChapter ListNext »