Bookstruck

सोन्यामारुति 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मग विचारा, अवश्य विचारा'' लोक ओरडले. ते गृहस्थ बोलूं लागले.

''राम हा वानरांची बाजू घेणारा होता. वानर हे खरें म्हटलें तर अनार्य होते. आर्य लोक या अनार्यांना तुच्छतेनें वानर म्हणत. रावण हा आर्यच होता. तो वेदविद्येचा भक्त होता. त्यानें वेदांवर भाष्येंहि लिहिलीं होतीं. परंतु वेदांवर भाष्यें लिहिणारा रावण लाखों अनार्यांना छळूं लागला. त्यांची संपत्ति त्यानें लुटली. त्यानें सोन्याच्या हवेल्या बांधल्या. अनार्य लोकांना रहावयाला घरें नाहींशीं झालीं. खवयाला पाल्याशिवाय कांहीं राहिलें नाहीं. आर्य रामचंद्राला हा अन्याय पहावेना. रामचंद्र आर्य अनार्य पहात नसे. तो फक्त माणुसकी ओळखीत असे. आर्य रावण त्याला राक्षसासारखा वाटला. अनार्य वानर त्याला आर्यांपेक्षां थोर चारित्र्याचे वाटले. या तुच्छ मानलेल्या लोकांचा मारुति हा एक पुढारी होता. रामाला त्याच्याशिवाय चैन पडत नसे. रामानें मारुतीला हाताशीं धरुन रावणाचा नाश केला. वानरांना वैभव दिलें. तिरस्कृत वानरांना रामानें वंद्य देवत्व दिलें. वानरांना थोर संस्कृति दिली !

बंधूंनों! तिरस्कृत लोक म्हणजे वानर होत. रामाचा खरा भक्त तिरस्कृत लोकांची बाजू घेईल. तिरस्कृत लोकांच्या पुढार्‍यांना मान देईल. शेटजींच्या मिलमधील शेंकडो मजूर वानरांप्रमाणे-पशूप्रमाणे-वागविले जात आहेत. त्या वानरांच्या पुढार्‍यांना कामावरुन काढून टाकण्यांत येत आहे. शेटजींनीं येथें जाहीर करावें कीं, मिलमधील मजुरांना मी माणसांप्रमाणे वागवीन. त्यांच्या पुढार्‍यांजवळ त्यांच्या सुखदु:खांची चर्चा करीन. मिलमधील मजुरांचे पुढारी म्हणजे सोन्यामारुति होत. ह्या सोन्यामारुतींना दंडे मारूं बघतां, आणि त्या दगडी सोन्यामारुतीला मुकुट घालतां काय ? ''

''अहो, पुरे करा. वाहावलेत, बसा.''

''मी बसणार नाहीं. उठलेले वानर बसत नसतात.''

''त्यांना बसवण्यांत येईल. ही धर्मसभा आहे. तुमची मजुरी ठरवण्याची ही सभा नव्हे.''

''मजुरांची मजुरी ठरवणें, त्यांना पोटभर भाकर देणें याहून थोर धर्म कोणता ? त्यांना नीट घरें बांधून देणें, त्यांच्या घरांत आनंद निर्माण करणें, याहून महान् धर्म कोणता ? ''

''याला पोटोबा धर्म म्हणतात. तुम्हांला पोटापलीकडे कांहीं नाहीं वाटतें?''

''पोटापलीकडे, तुमचे दंडे खाणारी आमची वांकलेली पाठ आहे !''

''धर्म म्हणजे थट्टा नव्हे''

''मीहि तेंच म्हणतो. धर्म म्हणजे समता, न्याय. ''

''धर्म म्हणजे थोर वस्तु आहे. येथून तुम्ही जा.''

« PreviousChapter ListNext »