Bookstruck

सोन्यामारुति 48

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वसंता : मिलिटरींत पोत्यांचीं पोटें बागनेटनें फाडायला शिकवतात, तसेंच हें.

वेदपुरूष : तुरुंगात जो कैदी फटके मारणारा असतो, त्याची प्रकृति नीट राहावी म्हणून काळजी घेण्यांत येत असते. तो जर अशक्त झाला तर फटके नीट मारणें होणार नाहीं. कर्तव्य उत्कृष्टपणें त्याला पार पाडतां येणार नाहीं. यासाठी त्याला दूध वगैरे देण्यांत येतें.

वसंता : फटके मारल्यावर काय करतात ?

वेदपुरूष : डॉक्टर पट्टया बांधतात! फटके मारायला योग्य आहे कीं नाहीं याचीहि परीक्षा डॉक्टर आधीं करतात.

वसंता
: ही अमानुष शिक्षा आहे.

वेदपुरूष : तुरूंग ही संस्थाच अमानुष आहे. ज्याच्या डोक्यांतून ही संस्था  निघाली त्याच्या बुध्दीची धन्य होय. शिक्षांचे अनेक प्रकार येथें हुडकून काढण्यांत येत असतात. हातबिडी, दंडाबिडी, आधाबिडी, खडीबिडी, मागेंबिडी किती तरी आहेत बिड्या देण्याचे प्रकार! मानवाची जितकी मानखंडना व अवहेलना करतां येईल तितकी येथें करण्यांत येते. मानव्याचा मोठेपणा दुर्दैवी कैद्याच्या मनावर अशानें कसा बरें बिंबेल! पदोपदीं त्याला पशु म्हणून जर वागविण्यांत येतें तर तो पशूच होईल. तुरुंग म्हणजे माणसांचे पशू बनविण्याची जागा, असें म्हटलें तरी चालेल.

वसंता : या कैद्यांना कोठें नेण्यांत येत आहे ?

वेदपुरुष : खटल्यावर.

वसंता : म्हणजे ?

वेदपुरुष : जो कैदी नीट वागणार नाहीं त्याला दररोज सुपरिंटेंडेंट आले म्हणजे त्यांच्यासमोर नेण्यांत येत असतें.

वसंता : आपण पाहूं या ते नमुने.

जेलर : रत्न्या !

सुभेदार : नीट उभा रहा रे.

सुपरिंटेंडेंट : काय केलेंस ?

सुभेदार : बाहेर बगीच्यांतील दोन मोठीं रताळीं यानें काम करतांना खाल्लीं.

सुपरिंटेंडेंट : होय रे ? बाहेर चोरी करतां आणि तुरुंगांतहि चोरी ? खाल्लींस कीं नाहीं ?

रत्न्या : होय.

जेलर : तूं शिपायाला शिव्या दिल्यास ?

रत्न्या : एवढेंसें खाल्लें म्हणून काय झालें, एवढेंच मीं म्हटलें.

शिपाई : नाहीं साब. हा फार मस्तवाल आहे. ''आम्ही रताळीं येथें पिकवतों तर आम्हांला खाण्याचा अधिकार नाहीं का ? साब लोकांकडे रताळीं जातात. आम्हीं खाल्लें तर चोर, आणि ते फुकट श्रम न करतांना खातात, ते नाहीं का चोर ?'' इतकी याची भाषा. हा इतरांना फितवतो. फार भयंकर आहे हा मनुष्य.

सुपरिंटेंडेंट
: तीन महिने दंडबिडी. चक्की. जाव.

वाल्या! कोण आहे वाल्या ?

« PreviousChapter ListNext »