Bookstruck

सोन्यामारुति 77

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पांचवें दर्शन

वसंता : कालचा तो भिल्ल किती प्रामाणिक! झोंपडींतून अशीं हीं सोन्यासारखीं जीवनें पडलेली आहेत. यांना रानटी म्हणतात! लिखतपढतवाले, स्वच्छ कपडे वापरणारे यांना संस्कृतिहीन समजतात! ते आगगाडींत बसलेले वकील-शेठजी खरे सुधारलेले कीं हे भिल्ल सुधारलेले! रानटी कोण ? सुधारलेला कोण ?

वेदपुरुष : मागें चीन देशांत एकदां एक युरोपियन गेला होता. तिबेटांत तो गेला होता. सुदंर पक्ष्यांना तो गोळ्या घालीत असे. एकदां सुदंर पक्ष्यांच्या जोडप्यावर तो गोळी सोडणार इतक्यांत एक रानटी तिबेटी त्याला म्हणाला, ''नका मारूं महाराज. ही जात फार थोर आहे. या जोडप्यांतील जर एक मारलें गेलें, तर उरलेलें दुसरे सारखें मरेपर्यंत टाहो फोडील. पांखरांच्या या जातींत प्रेम फार आहे. पातिव्रत्य फार आहे. नर दुसरी मादी बघत नाहीं, मादी दुसर्‍या नराकडे जात नाहीं. नका मारूं महाराज.'' परंतु त्या सुधारलेल्या साहेबानें हंसत हंसत दोघांना मारलें व म्हणाला, ''आतां एकाला दु:खांत रहायला नको !

वसंता : सुधारणा, संस्कृति यांचा अर्थ काय ?

वेदपुरुष : मारण्याचीं अधिक प्रभावी साधनें ज्याच्याजवळ असतील, छळण्याचीं व्यवस्थित यंत्रें ज्याच्याजवळ असतील, पिळण्याचीं सुंदर तत्तवज्ञानें जो शोधून काढतो त्याला जग सुसंस्कृत व सुधारलेला म्हणत असतें.

वसंता : मनुष्याचें हृदय किती मोठें झालें आहे, समाजांतील कायदे असमता, विषमता कितपत घालवीत आहेत, सर्वांच्या जीवनांत आनंद व समाधान, ज्ञान व कला किती निर्माण केलीं जात आहेत यावरून नको का संस्कृति मापायला ?

वेदपुरुष : वास्तविक तसें पाहिजे. परंतु आज तरी तसें नाहीं.

वसंता : त्या तिकडे प्रचंड इमारती कशासाठीं आहेत ?

वेदपुरुष : त्या विद्यापीठाच्या इमारती आहेत.

वसंता : त्या इमारतींतून कोणतें काम चालतें ?

वेदपुरुष : विद्येचें पीठ करण्याचें, ज्ञानाचा चुरा करण्याचें.

वसंता : म्हणजे ?

वेदपुरुष
: मुलांच्या जीवनांना भरडणारा हा प्रचंड कारखाना आहे. जीवनें नि:सत्य व निरानन्द करणारें हें राक्षसी यंत्र आहे. हीं विद्यापीठें शरीराकडे लक्ष देत नाहींत, हृदयाची त्यांना जाणीव नाहीं, आत्म्याला मानीत नाहींत. डोक्यांचा विकास करावयाचा असें त्यांचें ध्येय असतें. परंतु डोक्यांचा विकास होण्याऐवजीं डोक्यांचीं खोकीं होत आहेत.

वसंता : या गोष्टीकडे कोणाचेंच लक्ष नाहीं ?

« PreviousChapter ListNext »