Bookstruck

सोन्यामारुति 81

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वसंता : तुमच्या घराचें भाडें ?

मुलगा : चार रुपयांची आहे खोली.

वसंता : तेथें उजेड आहे ?

मुलगा : तेथें ओल असते व अंधार असतो.

चसंता : उगी. रडूं नको.

वेदपुरुष : वसंता, चल.

वसंता : कोठें ?

वेदपुरुष : आपण खोलींत गुप्तरूपानें शिरूं. तें बघ दृश्य.

वसंता : कां मारताहेत मुलाला ?

वेदपुरुष : त्यानें दोन्ही बाजूंनीं लिहिलें म्हणून !

वसंता : तो गरीब मुलगा वह्या कोठून आणील ?

वेदपुरुष : इन्स्पेक्टर म्हणतात एका बाजूनें लिहा! विदेशी कागद जास्त खपतील !

वसंता : आणि त्या एका मुलाला कां बरें मारताहेत ?

वेदपुरुष : तो वहीवर कविता लिहीत बसला होता. मास्तरांच्या शिकवण्याकडे त्याचें लक्ष नव्हतें !

वसंता : काव्याची प्रतिभा मारली जात आहे! मोत्याची माती होत आहे!

वेदपुरुष : यालाच शिक्षण म्हणतात! सर्वांना तेंच तें शिक्षण! एका दाबांत घालून सर्वांचीं मनें एकाच प्रकारच्या गुणधर्मांचीं करण्याचा हा प्रयत्न आहे. त्रिकोण असो, गोल असो, सारे चौकोनांतून आंत घुसवले जात आहेत! मुलांच्या गुणधर्माकडे लक्ष नाहीं. मुलांचा वर्ण पाहिला जात नाहीं. त्यांच्या हृदयाचा, बुध्दीचा रंग कोण पाहतो ? विद्यापीठ ठरवील तो रंग; इन्स्पेक्टर सांगेल त्या नियमांनीं व त्या बंधनांत, शिक्षक मुलांच्या जीवनाला फळकूट समजून, माती समजून, तो रंग देत असतो! केवढा नाश, केवढी हत्या! भारतीय मुलांची केवढी कत्ताल! आणि तिकडे दगडी सोन्यामारूतीच्या समोर घंटा वाजवीत आहेत !

वसंता : ही इकडे कशाची खोली आहे ?

« PreviousChapter ListNext »