Bookstruck

सोन्यामारुति 89

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वेदपुरुष : तो मुकादम येत आहे. हातांत छडी घेऊन हुकूम रावबहादुर येत आहे.

वसंता : तो तिला बोलणार बहुतकरून.

वेदपुरुष : पाहूं या काय होतें तें !

मुकादम : येथें गोळा करीत काय बसलीस! ती पलीकडची रावबहाद्दूर गल्ली राहिली आहे ना अजून ? तुम्हांला दंड केला पाहिजे आणि ही रद्दी पुन्हा गोळा केलीस ?

बाईं : राहूं दे रे दादा.

मुकादम : रद्दी गोळा नाहीं करायची या उकिरड्यावरची रद्दी तुम्हीं चिवडेवाल्यांना विकतां, मिठाईवाल्यांना विकतां, डाळमुरमुरेवाल्यांना विकतां. गांवांत रोग फैलावतात. मागें दंड झाले तरी तुम्हांला याद नाहीं, फेंक ती रद्दी. फेंक सारी. काढून टाकीन कामावरून! माजलींत सारीं नाहीं ? फेंक म्हणतों ना तो रद्दी! उचलतेस कीं नाहीं ?

बाई : आणा अर्धा आणा दादा मिळेल. राहूं दे. ही चांगली रद्दी आहे. घाण नाहीं. केसरीची रद्दी आहे ही.

मुकादम
: नाहीं सांगतों ना. मला वरून दट्टया बसतो.

बाई
: दहा रुपयेसुध्दां पगार नाहीं-मग काय करायचें दादा ? पोरांचें पोट कसें भरणार ?

मुकादम : दुसरीकडे नोकरी धर. कोठें पंधरा रुपये मिळतील तेथें जा. दहा रुपये येथें देतात. दुसर्‍या  म्युनिसिपालटींत तर बायकांना सात आहेत सात! तुम्हांला सवलत द्यावी तर तुम्ही माजतां ? फेंक ते कागद जा तिकडची गल्ली आधीं साफ कर.

वसंता : म्युनिसिपालिटीच्या डोक्यांत हें येत नाहीं की या बाया कागद कां नेतात ? पगार कमी, पोट भरत नाहीं, म्हणून कोंबड्याप्रमाणें हीं गरीब माणसें उकिरडे उकरतात! पगार जरा वाढवला तर असे उकिरडे उकरण्याची का त्यांना हौस आहे !

वेदपुरुष
: हाच सारा चावटपणा आहे! परिस्थितीच्या मुळाशीं कोणी जात नाहीं. बंगालमध्यें अत्याचार होतात म्हणून तरुणांना घरोघर बंदी! बहिणींचे भाऊ, पत्नींचे पती, आईबापांची मुलें नेली ओढून, ठेवलीं एका कोंडवाड्यांत डांबून! अशानें का अत्याचार सरतील! देशांत अन्याय आहे, दारिद्रय आहे, गुलामगिरी आहे-म्हणून हे अत्याचार होतात. खरें स्वातंत्र्य हा यावर उपाय आहे! आत्महत्या करणें गुन्हा मानतात. परंतु लोक आत्महत्या कां करतात हें कोणी पहात नाहीं. बेकार मनुष्य आत्महत्या करतो. मुलांना पोसवत नाहीं म्हणून कोणी आत्महत्या करतो. समाजांत छळ म्हणून कोणी प्राण देतो! आत्महत्या करणारा दोषी नाहीं. आत्महत्या करायला लावणारा समाज दोषी आहे. आत्महत्या होत असतांना संस्कृतीच्या गप्पा मारणारे दोषी आहेत. परंतु आत्महत्या करणारा सांपडला तर त्याला हें गाजरपारखी जग वेडा म्हणून संबोधितें आणि तुरुंगात पाठवतें. अब्रूनें जगूं देत नाहीं, अब्रूनें मरूं देत नाहीं.

« PreviousChapter ListNext »