Bookstruck

सोन्यामारुति 116

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुजारी : गांधीना धर्म कोठें आहे ? म्हणतात महाराजा जवळ घ्या, भंग्याला जवळ घ्या! गांधी म्हणजे हिंदु धर्माला  पोखरणारा भुंगा !

वंसता ''महात्मा गांधीकी जय'', ''हिंदु धंर्मकी जय'' म्हणतो. ती आकाशवाणी आहे असें लोकांना वाटतें. तेहि गर्जना करतात.

स्वयंसेवक : गांधीजी हिंदु धर्माचें जेवढें संरक्षण करीत आहेत, तेवढें कोण करीत आहे ? चारपांच कोटी हरिजन परधर्मात जाऊं नयेत म्हणून कोण ठिकठिकाणीं आश्रम स्थापन, शाळा-उद्योगमंदिरें काढीत आहे ? त्रावणकोरांतील हरिजन लाखोंनी ख्रिस्ती होत होते. महात्माजींच्या तपश्चर्येनें व त्यागानें ते आतां हिंदु धर्मात राहतील! गुजराथमध्ये भिल्ल लोकांची गेली पंधरा वर्षे महात्माजींचे लोक सेवा करीत आहेंत व परधर्मापासून त्यांना सांभाळीत आहेत! अमरकंटकाच्या जंगलांत गोंड लोकांत महात्माजींचे मित्र सेवा करीत आहे आंधळ्यानो! अहंकारानें बरबटलेल्यांनो! बडबड करुन हिंदु धर्माच संरक्षण होत नाही. हिंदु समाजाचीं झालेली छकलें प्रेमाने एकजीव केल्यानेंच हिंदु धर्म बलवान होईल. आधी परस्परांबद्दल प्रेम शिकवा. हिदूंहिंदूंत तरी आधीं प्रेम निर्माण करा. तुच्छ भाव फेंका. अस्पृश्यता फेंका. तसे न कराल तर ह्या हिंदु स्वयसेंवकांच्या लाठ्या हिंदूंच्याच डोक्यांत बसतील !

पोलीस : हें मूल तुमच्या ताब्यांत घ्या .

'हिंदु धर्म की जय' प्रचंड जयघोष होतो! त्या मुलांचें दर्शन घेण्यासाठीं रवंदारवंदळ सुरू होत.

स्वयंसेवक : गुदमरेल मूल. कुसकुरेल फूल! जाऊं दे मला.

पुजारी : जाऊं दे एकदां धिंडका. येथें राममंदिरांत भ्रष्टाकार नको.

लोक
: तुम्हीच भ्रष्टाकार करणारे. तुम्हीच जा. करा काळें.

पुजारी
: हें खाजगी मंदिर आहे. समजलांत ? निघा सारे बाहेर.

वसंता : वेदपुरुषा! किती स्त्रियांच्या गळ्यांना असे फांस लागत असंतील किंवा किती स्त्रिया जीव देत असतील, किती परधर्मात जात असतील! अशीं किती अनाथ मुलें उकिरड्यावरें फेंकलीं जात असतील! सुंदर निष्पाप मुलें, ताजीं गोड फुलें !

वेदपुरुष : परंतु तिकडे कोणाचें लक्ष आहे ? संस्कृतिसंरक्षकांचे नाहीं, धर्ममंडळाचें नाहीं, आचार्यपीठाचें नाही, संतांच्या गाद्यांवर बसून सरकारला आर्शीवाद देणार्‍या महाराजांचे नाही. तिकडे सोन्यामारुतीच्या घंटा वाजवतील! या अनंत जिवांच्या हांका कोण ऐकणार! या समाजांतील अन्यायांचे उच्चाटन व्हावें म्हणून कोण भेरी वाजवणार ? कोण शिंगें फुंकणार ?

« PreviousChapter ListNext »