Bookstruck

सोन्यामारुति 122

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

''भाऊ! मोठ्या भाऊ! तुला वाचण्याची जरूरी नाही. जे येथे सांगितलेंस तें सर्वत्र सांग. हीं सोन्यामारुतींची मंदिरे सर्वाना दाखव. एका प्रखरमय भावनेनें मनुष्य एका क्षणांत सारे शिकतो, जें भावनाहीनास तपेंच्या तपें अध्ययन करुन पूर्णपणें समजत नाही! जा! भाऊ जा! महाराष्ट्रभर जा! तुझा आमचा झेंडा एक. तूं आमच्या झेंड्याच्या खाली आलास. आम्हांला किती आनंद होईल! किती उत्साह चढेल आतां! आम्हीही नाचूं, कूंदूं, गांवोगाव जाऊं. पेटवूं खेडीपाडी. पेटवू महाराष्ट्र पेटवूं विशाल भारत! पेटणार्‍या जगात पेट घेणारा भारतहि शोभूं दे! कोट्यावधि सोन्यामारुति जागे होऊं देत. या प्रंचड घंटा घणणणणण वाजूं देत. चला, आपण या घंटा वाजवू! अनंत सोन्यामारुतींच्या मंदिरांतील प्रचंड घंटा.'' भाऊ भराभरा भावना शब्दांत ओतीत होता.

तेथें तो लाल झेंडा होता. धाकट्या भावानें तो हातांत धरला, मोठा भाऊ तेथें उभा राहिला. सारी मुलें उभीं राहिली. ''खर्‍या सोन्यामारुतीचा जयजयकार असो! अनंत सोन्यामारुतींचा जयजयकार असो !'' असे जयध्वनि झाले व त्या नदीतीरावर, त्या ओंकारेश्वराच्या भोंवतीं, त्या स्मशानांत, त्या रस्त्यांत, त्या गल्लीत, सर्वत्र ते दुमदुमु लागले. जयध्वनीचे प्रतिध्वनि आपटत आपटत सार्‍या महाराष्ट्रभर गेले, हिदुंस्थानभर गेले, सर्वत्र गेले.

« PreviousChapter List