Bookstruck

स्वदेशी समाज 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इंग्रजामध्ये जे सुंदर आहे, मंगल आहे, उत्कृष्ट आहे, त्याचे जर येथे आपणांस दर्शन झाले नाही, इंग्रज म्हणजे एक बनिया, उदारभावनाशून्य द्रव्यपूजक, हडेलहष्पी करणारा नोकरशाहीचा एक पित्त्या. असेच जर आपल्या अनुभवास नेहमी आले ; मनुष्य मनुष्याला ज्या ठिकाणी मोकळेपणाने भेटतो, बोलतो संवरतो, विश्वास दाखवितो, अशा भूमिकेवर जर इंग्रज कधी येणारच नाही ; तो जर नेहमी उंच हवेतच अहंकाराने राहील ; आणि अशा रीतीने इंग्रज व हिंदी लोक जर सदैव दूर दूरच राहावयाचे असतील, तर दोघांसहि केवळ दुःख व ताप यांचीच प्राप्ति होणार यांत शंका नाही. अशा स्थितीत जो सत्ताधीश असेल तो दडपशाहीने कायदे करून असंतोष दूर करू पाहील. परन्तु अशाने असंतोष कायमचा दूर करता येणार नाही. इंग्रजालाहि या स्थितीने कायमचे समाधान राहील असे नाही.

एक काळ असा होता की ज्या वेळेस डेव्हिड हेअरसारखे थोर मनाचे इंग्रज लोक आपल्याजवळ प्रेमाने आले, इंग्रजी स्वभावांतील भलाई त्यांनी दाखवली. त्या काळांतील हिंदी विद्यार्थांनी आपली हृदये ब्रिटिशांस अर्पण केली होती. परन्तु आजचा जमाना बदलला आहे. आजचा हिंदुस्थानांतील इंग्रज प्रोफेसर इंग्रजांतील चांगुलपणाचा प्रतिनिधि राहिला नसून, त्यांच्या चारित्र्याला तो काळिमा फाशित आहे. पूर्वी ज्याप्रमाणे विद्यार्थी इंग्रजी वाङमयात रंगून जात, शेक्सपिअर व बायरन यांच्याबद्दल त्यांना जे काही वाटे, तसे आज काहीएक राहिले नाही.

शिक्षणाच्याच बाबतीत हे असे झाले आहे असे नाही. इंग्रज मनुष्य, मग तो प्रोफेसर असो वा पोलिसअधिकारी असो, न्यायाधीश असो वा व्यापारी असो, स्वतःच्या संस्कृतीतील उत्कृष्टपणा तो प्रकट करित नाही. यामुळे इंग्रजांच्या येण्यामुळे जो सर्वात मोठा फायदा व्हावयाचा तो होत नाही. हिंदुस्थानचा पदोपदी उपमर्द केला जातो, तेजोभंग केला जातो. भारतीयांची सर्व प्रकारची शक्ति खच्ची केली जात आहे. यामुळे इंग्रजांबद्दलची निष्ठा, आदर, सारे नाहीसे झाले आहे.

पूर्व व पश्चिम जवळ येऊ शकत नाहीत, म्हणून हा असंतोष माजून राहिला आहे. एकमेकांजवळ सदैव रहावे तर लागते, परन्तु एकमेक मित्र तर होऊ शकत नाही. ही स्थिति अति दुःखाची व दुर्दैवाची होय. ही भयंकर परिस्थिति आहे. याहून दुसरी कोणती भयंकर आपत्ति ? ही परिस्थिती लौकर नष्ट करू या, लौकर बदलू या, असा ध्यास हृदयास लागला पाहिजे. हृदयांतील सद्भावनेने असल्या भीषण परिस्थितीविरुद्ध बंड केले पाहिजे. या बंडांत नफानुकसानीकडे न बघता आपण सर्वस्व पणास लावले पाहिजे.

परन्तु हृदयांतील सद्भावनेचे बंड कायमचे टिकत नसते हीहि गोष्ट खरी. ते क्षणिक वादळ असते. काही असो. किती जरी प्रगतिविरोधक, निराशाजनक अशी परिस्थिति असली, तर एक गोष्ट सत्य आहे, की हा जो पूर्व पश्चिमेचा संबंध जडला आहे, त्यांतून काही तरी मंगल निर्माण करून घेतल्याशिवाय मोक्ष नाही. पश्चिमेपासून जे जे घेण्यासारखे आहे, जे जे चांगले आहे ते ते घेतल्यावाचून आपली सुटका नाही. फळ पिकल्याशिवाय देठापासून सुटत नाही. आणि पिकण्यापूर्वीच जर देठापासून ते अलग होण्याचा प्रयत्न करील तर ते कधी पिकणार नाही.

« PreviousChapter ListNext »