Bookstruck

स्वदेशी समाज 39

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

“नायमात्मा बलहीनेन लभ्यः” अशी श्रुति आहे. दुबळ्याला सत्यदर्शन नाही, मोक्ष नाही. मोठमोठी अलंकारिक भाषणे वा विकारवश होऊन केलेले अत्याचार, यांच्या द्वारा सामर्थ्य प्रकट होत नाही. ते प्रकट होण्याचे दुसरे मार्ग आहेत. त्याग व सेवा यांच्या मापाने सामर्थ्य मापले जाते. जोपर्यंत हिंदी मनुष्य भीति टाकणार नाही, स्वार्थ सोडणार नाही, विलास विसरणार नाही, चैन चुलीत घालणार नाही, आरामाला हराम मानणार नाही, तो पर्यंत सरकाळ जवळ मागण्यांत अर्थ नाही. भारतमातेच्या सेवेसाठी, जे उत्कृष्ट व उदात्त आहे ते संपादण्यासाठी, सर्वस्वत्यागाने जोपर्यंत हिंदी जनता उभी राहणार नाही, तोपर्यंत सरकार जवळ मागणे म्हणजे व्यर्थ भीक मागणे होय. अशी भीक मागून आपण दिवसेंदिवस अधिकच निःसत्व व निकामी होऊ. अधिकाधिक आपला पाणउतारा होईल. त्यागाचे मोल देऊन जेव्हा आपण आपला देश आपलासा करू, आपल्या सर्व शक्ती आपल्या देशासाठी उपयोगात आणू, अहोरात्र उदंड परिश्रम करू, त्यावेळेस लाजेने इंग्रजांच्या दारांत भीक मागण्याची जरूर रहाणार नाही. आपण जर नीच न होऊ तर इंग्रजांसही नीच व्हावे लागणार नाही. मग आपण सहकारी होऊ शकू व समानतेने आणि आदराने एकत्र बसून सलोख्याचे व स्नेहाचे संबंध निर्मू शकू.

जोपर्यंत हिंदी समाजातील क्षुद्रपणा व मूर्खपणा जात नाही, तोपर्यंत माणुसकीचे पुरे हक्क आपल्याच बांधवांस आपण देत नाही, जोपर्यंत उच्च वर्ण खालच्या बंधूस पशुहूनहि तुच्छ लेखित आहेत, जोपर्यंत जमीनदार कळांना गुलामाप्रमाणे वागवीत आहेत, जोपर्यंत आपले देशीच अधिकारी हाताखालच्या लोकांना पायांखाली तुडविण्यातं मोठेपणा मानित आहेत, तोपर्यंत इंग्रजाने आमच्याशी नीट वागावे असे सांगण्यात आपणांस खरे सामर्थ नाही व असे सांगण्याचा हक्कहि नाही.

आज आपण हिंदुस्थानांत प्रत्येक बाबतीत, मग ती बाब धार्मिक असो वा सामाजिक असो, राजकीय असो वा कोणतीही असो मनुष्यास न शोभेसे वागत आहोत. आपला सारा व्यवहार ओंगळ झाला आहे. भारताचा मोठेपणा आपल्या कृतींतून कोठेच प्रकट होत नाही. भारतीय आत्मा त्यागाने अद्याप तळपत नाही, म्हणून प्रयत्नांस फळ लागत नाही. समानतेच्या नात्याने बाह्य जगास आपणांस भेटता येत नाही व बाहेरच्या जगाजवळचे मौल्यवान घेता येत नाही. जे अपमान व जे कष्ट आपणांस आज भोगावे लागत आहेत, त्याला इंग्रज हा एक निमित्त कारण आहे. अत्याचार करून वा चार गप्पासप्पा मारून आपली स्थिती सुधारता येणार नाही. सामर्थाने समान होऊन जेव्हा इंग्रजास भेटू तेव्हाच वैरभाव मावळेल. तेव्हाच विरोधाची सारी कारणे नष्ट होतील, मग पूर्व पश्चिम एकत्र येतील. तेव्हा मग राष्ट्र राष्ट्राला, ज्ञान ज्ञानाला, यत्न यत्नाला भेटतील. त्यावेळेस हिंदुस्थानचा इतिहास पुरा होईल. मिळवायचे होते ते मिळाले असे होईल. मग हिंदुस्थानचा इतिहास जगाच्या इतिहासात मिळून जाईल व जगाच्या ख-या इतिहासास आरंभ होईल.

« PreviousChapter List