Bookstruck

साधना 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ते पाणी त्याच्या आत्म्यासही स्पर्श करते. जोपर्यंत मानवी सृष्टीशी अद्वैत अनुभवणार नाही तोवर आपण दुर्गम, दुष्पथ अंधारात येऊन पडलो आहोत, असेच त्याला वाटेल. वस्तुमात्रात असलेले सनातन आत्मतत्त्व अनुभवूनच मनुष्य मुक्त होत असतो. जीवनाचा संपूर्ण हेतू मनुष्य या अनुभवानेच समजू शकतो. सृष्टीशी मानवाचे ऐक्य आहे, यावर हिंदू धर्माने भर दिला आहे. उगवत्या सूर्याला आपण अर्घ्य देतो. वाहत्या नदीला प्रणाम करतो. भूमातेला वंदितो. का? आपल्यामधील चैतन्य बाह्यसृष्टीशी अखंड अद्वैत अनुभवीत असते.

सृष्टीशी अद्वैत अनुभवणार्‍या ऋषींनी पदार्थांमध्ये असणारी भिन्नता स्वीकारली नव्हती असे नाही. ही भिन्नता न स्वीकारू तर मानवी जीवनच अशक्य होईल. ईश्वराच्या या सृष्टीत मानवप्राणी श्रेष्ठ का, या विषयाचे भारतीय मत इतरांच्या मताहून निराळे आहे. मनुष्य मानवेतर सृष्टीला जिंकून घेतो म्हणून तो श्रेष्ठ असे नाही; तर या चराचराशी अद्वैत अनुभवण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे म्हणून तो मोठा. भारतीय तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी आहेत,-जेथे सृष्टीचे भव्य सौंदर्य आहे. तेथे गेल्याने रोजच्या स्वार्थी संसारातील संकुचित मन विशाल होते, व अनंताशी एकता अनुभवू शकते. या अनुभवासाठीच जीवमात्राविषयी दया, सहानुभूती, प्रेम असण्याची आपणास जरूरी वाटली. भूमात्राविषयीच्या सहानुभूतीची ऋषिमुनींनी शिकवण दिली. या अनुभवासाठीच मांसाशन-त्यागाचा जगातील अद्वितीय प्रयोग येथे आपण केला.

ज्या वेळेस भिंती बांधून मनुष्य स्वतःला विश्वापासून अलग मानतो, ‘या विश्वातीलच एक’ असे स्वतःला न मानता विश्वाचा दावेदार होऊन एकटा एका बाजूला उभा राहतो, त्या वेळेस मोठी बिकट परिस्थिती उत्पन्न होते. सृष्टीजवळचा संबंध सोडून मानवजातीच्या अलग एकेरी दोरीवरूनच चालण्याचा जेव्हा मनुष्य प्रयत्न करू लागतो, तेव्हा त्याला फार जपून सर्कस करावी लागते. जीवनातील गुंतागुंतींनी तो बेजार होतो आणि परमेश्वराच्या डोक्यावर सारे खापर फोडतो. ‘ही सृष्टी मला छळण्यासाठी ईश्वराने निर्माण केली’ असे तो अट्टाहासाने म्हणतो आणि सृष्टीला मी जिंकीन अशी ऐट मारतो; आपली पाठ थोपटून घेतो.

सृष्टीशी असे भीषण वैर मानून राहणे अशक्य आहे. मनुष्याने स्वतःच्या जीवनाची समग्रता समजून घेतली पाहिजे. या विराट जीवनातील स्वतःचे स्थान त्याने जाणले पाहिजे. मधाच्या पोळयात राहून कधीही मध निर्माण करता येत नसतो. मानवी जीवनाचा मधु-झरा स्वार्थाच्या पलीकडे जाल तेव्हाच दिसेल. स्वतःच्या योगक्षेमासाठी स्वतःवरच सारा भर देऊन मनुष्य विश्वापासून अलग होऊन उभा राहतो तेव्हा तो शेवटी अस्वस्थ होतो, संतप्त होतो. वेडा बनून स्वतःचेच तुकडे करू लागतो, स्वतःलाच फाडफाडून खाऊ लागतो. मानवी जीवनातील संपूर्णता भिरकावून दिल्यामुळे त्याला गरिबीतील साधेपणा दिसत नाही, श्रीमंतीत उदारता दाखवता येत नाही. गरीबी त्याला भेसूर वाटते, श्रीमंती त्याला मदान्ध करते. त्याची तृष्णा विकासाचे साधन न राहता जीवानचे मातेरे करते. भोगवृत्तीला सीमाच उरत नाही. संयम, प्रमाणबध्दता यांचा अस्त होतो. मग वासनातृप्ती हेच एक ध्येय समोर उरते. विश्वजीवनापासून अलग होऊन जेव्हा मानव जगू पाहतो, तेव्हा तो दुसर्‍यास प्रेमाने आकर्षू शकत नाही. काही तरी चमत्कार करून, अद्भुत करून तो दुसर्‍यास चकित करू पाहतो. कलेत नवीनता आणायला धावतो. परंतु नवीन नवीन स्वरूपात प्रकट होणारे जे सनातन सत्य ते मात्र त्याला दिसत नाही. साहित्यातही मानवाचे संपूर्ण दर्शन होत नाही. साधेपणातील मानवाचा मोठेपणा वाङ्मयात प्रकट होत नाही. मनुष्य म्हणजे मानसशास्त्रीय कोडे, वासनामय प्राणी, एखाद्या अत्युत्कट विकाराचे-भावनेचे मूर्तरूप, अशा प्रकारे तो दाखवला जातो. कृत्रिम प्रकाशाच्या झगमगाटात मानव उभा दिसतो व भेसूर वाटतो. मानव मानवापुरताच पाहणारा झाला की त्याच्या हृदयातील थोर भावनांचे पोषण होत नाही. त्या भावनांना तेथे मूळ धरायला जागाच नाही मिळत. मानव मग नेहमी अतृप्त, अधाशी असतो. तो अद्वैताचा चारा न मिळाल्यामुळे त्याचा उत्साह उरत नाही. उत्तेजक कृत्रिम उपायांनी सुखाचा नि उत्साहाचा क्षणिक डोलारा तो मांडू बघतो. आपला मोठेपणा आपल्या लठ्ठपणात आहे असे त्याला वाटते. स्वतःच्या कर्मव्यापारांची किंमत मानसिक शान्ती किती मिळाली यावरून न करता धावपळ व हालचाल किती केली यावरून तो करतो. जी शान्ती सृष्टीच्या नक्षत्रखचित आकाशात भरलेली असते, सृष्टीच्या तालबध्द नृत्यात नि संगीतात जी आहे, तिची त्याला कल्पनाच नसते.

« PreviousChapter ListNext »