Bookstruck

तीन मुले 1

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

तीन मुले

सारंग गावची गोष्ट आहे. सारंग गाव समुद्रकाठी होता. मोठा सुखी, व समृध्द गाव, दर्यावर्दी व्यापार तेथे फार चाले. तेथून मालाने भरलेली गलबते दूर देशांत जात व दूरच्या देशांची मालाने भरलेली गलबते तेथे येत. बंदर नेहमी गजबजलेले असे. देशोदेशीचे खलाशी येत. एकदोन दिवस मुक्काम करीत. पुन्हा जात. कधी वादळ असले, समुद्र खळलेला असला, म्हणजे ते अधिक दिवसही तेथे रहात. अशा वादळात गलबते फुटत, प्राणहानी होई. गलबतातील तरंगता माल तीरास येऊन लागे. एकदा नारळांनी  भरलेली गलबते वादळात फुटली. हजारो नारळ सारंग गावाच्या किना-यावर येऊन पडले. लोकांनी पोती भरभरुन नेले. खाववत ना म्हणून ते फोडून गुराढोरांना त्यांनी खायला घातले. इतक्या नारळांचे काय करावे हे लोकांना कळेना एकदा आंब्याची गलबते फुटली व हजारो कलमी आंबे किना-याला येऊन लागले. लोकांनी आंबे पाटया भरभरुन नेले. कधी कधी मेलेले खलाशी, मेलेली माणसेही किना-याला येऊन लागत. त्यांचे देह माशांनी खाल्लेले असत. ते देह पाहून भीती वाटे. गावातील कोणीतरी येत व त्या देहास मूठमाती देत. कधी एखादा जिवंत मनुष्यही किना-याला येऊन लागे. नावेच्या फुटक्या तुकडयाचा आधार घेऊन अथांग सागरातून तो किनारा गाठी. सारा गाव मग त्याच्या भोवती जमा होई व अंगावर काटे आणणा-या त्याच्या गोष्टी ऐके.

सारंग बंदर दिसे मोठे छान. समुद्रावर दाट नारळीची बने होती. समुद्र सारखा नाचत असे. नारळी सारख्या डोलत असत. त्या नारळींच्या बनांच्या मधून व्यापा-यांच्या वखारी असत. मधून मधून लहानमोठया खानावळी होत्या. त्या आजीबाईला कोणी नव्हते. ती एकटीच होती. कोणी एखादा मुशाफर येई व तिच्या खानावळीत उतरे. तिच्या एकटीचे जीवन अशा रीतीने पार पडे. समुद्रकाठी  खेळायला येणारी मुले या आजीबाईकडे यावयाची. म्हातारी त्यांना खाऊ द्यायची. कधी ती त्यांना एखादी गोष्ट सांगायची. ती मुले म्हणजे त्या म्हातारीची करमणूक असे.

अशा अनेक मुलांपैकीच ती तीन मुले होती. दोन होते मुलगे. एक होती मुलगी. मुलांची नावे बुधा व मंगा. मुलीचे नाव मधुरी. मधुरी व मंगा जवळ जवळ रहात असत. बुधाचे घर लांब होते. मधुरी व मंगा या दोघांची बुधाजवळ समुद्राच्या किना-यावरच ओळख झाली. एके दिवशी मधुरी व मंगा समुद्राच्या वाळूत खेळत होती. वाळूत किल्ले बांधीत होती; परंतु किल्ला टिकेला. किल्ला सारखा पडे.

‘तुला येतच नाही बांधता.’ मधुरी म्हणाली.
‘तू तरी दाखव बांधून!’ मंगा चिडून म्हणाला.
‘मुली वाटतं किल्ले बांधतात ?’ हसून मधुरीने विचारले.
‘मुलींना फक्त दुस-याला हसता येते.’ मंगा म्हणाला.
त्या दोघांचे असे भांडण चालले होते. जवळच एक मुलगा येऊन उभा राहिला होता. तो त्या दोघांकडे पहात होता. शेवटी त्याच्याने बोलल्यावाचून राहवेना. तो पुढे झाला व म्हणाला, मी देऊ का किल्ला बांधून?

Chapter ListNext »