Bookstruck

तीन मुले 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मंगा
मंगाचा बाप धाडसी व धडधाकट होता. तो साहसी होता. बापाचे हे गुण मुलामध्ये भरपूर उतरले होते. गलबतातील माल उतरता उतरता मंगाच्या बापाच्या मनात आपणही असे व्यापारी झालो तर, तर किती छान होईल असे येत असे. परंतु ते त्यांना जमले नाही. एखादे वेळेस बापलेकांचे असे संवाद होत असत.

‘बाबा, तुम्ही व्यापारी नाही झालेत; परंतु मी होईन. तुमची इच्छा मी पुढे पुरी करीन.
हो, व्यापारी हो. मिळमिळीत जगणे मला आवडत नाही. माझा मुलगा तरी पराक्रमी व श्रीमंत होऊ दे. राजाप्रमाणे जगू दे.
पिता मंगाच्या मनात असे विचार भरवी. मंगाही बंदरात काम करायला जात असे. माल चढविणे, उतरविणे हे काम करीत असे. एकदा मंगा एका व्यापा-याबरोबर परदेशात जाण्यासाठी निघाला होता. परंतु पित्याने त्याला जाऊ दिले नाही.

‘बाबा, का नाही मला जाऊ देत?’
‘मी मेल्यावर जा. मी जिवंत आहे तोपर्यंत जाऊ नकोस.’
‘का?’

‘तुला दूर पाठवावयास मला धीर होत नाही.’
मंगावर पित्याचे फार प्रेम होते. हळूहळू मंगाच्या लग्नाचे विचार पित्याच्या मनात खेळू लागले. आपल्या मुलाला एखाद्या श्रीमंताची मुलगी मिळावी असे त्याला वाटे. पुढे मंगाला जर व्यापारी व्हावयाचे झाले तर पैसे नकोत का? भांडवल नको का?

आणि खरोखर एकदा असा योग आला. एक व्यापारी सारंग गावी आला होता. आपल्या मुलीला योग्य असा वर पाहावयास आला होता. तो गावात सर्वत्र हिंडे. बंदरावर फिरावयास जाई. एके दिवशी बंदरातील म्हातारीच्या खानावळीत तो बसला होता. म्हातारीजवळ तो बसला होता. इतक्यात मंगा तेथे आला. मंगा सचिंत व खिन्न होता.

‘ये मंगा.’ म्हातारीने हाक मारली.
‘हे कोण पाहुणे?’ त्याने विचारले.
‘आपल्या गावातील रत्ने पाहावयास ते आले आहेत.’ ती म्हणाली.

‘आपल्या गावात कसली आहेत रत्ने?’
‘तुमच्या गावी रत्नाकर आहे. समुद्राला रत्नाकर म्हणतात. जेथे रत्नाकर आहे, तिथे का रत्ने नसतील?’ तो व्यापारी म्हणाला.

‘आम्ही लहानपणी बंदरावर फिरत असू. शिंपले गोळा करीत असू परंतु शिंपल्यातील मोती कधी मिळाला नाही. मोत्याचे शिंपले आमच्या समुद्रात होत नाहीत. आमच्या समुद्रात शंख, शिंपा, कवडया यांचाच साठा आहे.’ मंगा म्हणाला.
‘रत्नपारखी असतो त्याला रत्न सापडते. तुमचे नाव मंगा वाटते?’
व्यापा-याने विचारले.

« PreviousChapter ListNext »