Bookstruck

तीन मुले 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मधुरी!’
‘काय?’
‘चल जाऊ समुद्रात. जलमंदिरात राहू. नको हे जग. अथांग पाण्यात राहू. रात्रंदिवस संगीत. जवळ माणिकमोत्यांच्या राशी. येतेस?’

‘मंगा, वेडा आहेस तू, चल किना-याला.’
‘मला नाही नीरस जगात येववत.’
‘परंतु मी आहे ना तुझ्याजवळ?’
‘हो, आहेस.’

‘मग चल तर.’
दोघे पाण्याच्या बाहेर आली. अंधार पडू लागला. आकाशात तारे चमचम करीत होते. स्तब्धता होती. वारे व लाटा यांचे फक्त गान चालले होते. फिरत फिरत दोघे टेकडीवर आली.

‘मंगा, मी जाऊन येते.’
‘एकटी जाशील?’
‘हो. मधुरी निर्भय आहे.’

मधुरी गेली. मंगा तेथे बसून राहिला. त्याच्या मनात शेकडो विचार येत होते. तो मध्येच एकदम टाळी वाजवी व उभा राही. पुन्हा खाली बसे. जरा आडवा पडे. पुन्हा उठे. अशांत व अस्वस्थ होता तो.

आणि मधुरी गेली. रात्री बुधाला झोप येत नसते ही गोष्ट तिला माहीत होती. बुधा मधुरी म्हणत बसे. तोच त्याचा अखंड जप. बुधा जागा असेल ही मधुरीला खात्री होती. आणि बुधाचे घर आले; तो तिला काय दिसले? बुधा खिडकीतच उभा होता. मधुरीने वर पाहिले. तिने बुधा अशी मंजुळ हाक मारली.

‘कोण, मधुरी?’
‘हो. दार उघड.’
‘आली, माझी मधुरी आली.’
तो धावतच खाली आला. त्याने दार उघडले. मधुरी आत आली.

‘थांब, मी तुझा हात धरुन नेतो. पडशील. त्याने तिचा हात धरला. तो थरथरत होता. मध्येच जिन्यात तो थांबला. दोघांचे श्वास एकमेकांस ऐकू येत होते. मधुरी बोलली नाही. बुधाने शेवटी तिला वर नेले. ती त्याची खोली होती.

‘मधुरी, थांब तुझ्यासाठी नीट गादी घालतो.’
‘नको. मी येथेच बसते.’
‘नाही. गादीवर बस. ऐक माझे.’
त्याने गादी पसरली. तिच्यावर एक सुंदरशी शाल त्याने घातली. मधुरी गादीवर बसली. बुधा जवळ बसला.

« PreviousChapter ListNext »