Bookstruck

तीन मुले 76

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘हे काय मधुरी? रडतेस का अशी?’
‘येते खरे रडू.’
‘ताप उद्या निघेल. मोकळी होशील.’

‘ताप न निघो. असाच राहो.’
‘असे काय म्हणतेस?’

‘मी आजारी असले म्हणजे तू मला सोडून जाणार नाहीस. किती तरी दिवसांत आज तुझे प्रेम मिळते आहे, आज माझ्या अंगावर पांघरुण घातलेस. मंगा, तुझ्या प्रेमाचे पांघरुण का फाटले? पडू दे मला आजारी म्हणजे तुझे प्रेम पुन: पोटभर चाखीन. मी तुझ्या मांडीवर पुन: निजेन. तू जवळ असशील, माझा हात चेपशील, कपाळ दाबशील, पाय चुरशील. पडू दे मला आजारी. माझे आजारीपण तुला येथे बांधून ठेवील.’

‘वेडी आहेस मधुरी. माझे प्रेम चाखण्यासाठी का आजारीच पडायला हवे? मी दूर देशांतरास जाऊ म्हणतो तो तरी का? तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना? तू नसतीस तर कोणासाठी मी गेलो असतो? कोठे दूर गेलो तरी सारखी तूच डोळयांसमोर असशील. आजच्यापेक्षाही तू अधिक माझी होशील. माणसाचे प्रेम जवळून कळत नाही. परंतु दूर गेल्यावर ते कळते. बरे, ते जाऊ दे. आधी बरी हो.’ असे म्हणून तो मधुरीला थोपटू लागला.

‘इतक्यात सोन्या व रुपल्या आले. मधुरी रडत होती.
‘आई, रडतेसशी? बाबा, तुम्ही मारलेत आईला?’
‘नाही रे. तिनेच मला मारले व आपणच आता रडते.’
‘मलासुध्दा त्या दिवशी निखारा लावून स्वत:शीच रडायला लागली. वेडी आहे आई.

‘अरे, मनी कोठे आहे?’
‘आहे अंगणात.’
‘ती माती खाईल हो. जा आण.’
‘मीसुध्दा आता खडे व माती खाणार आहे बाबा.’

‘का रे?’
‘तुम्ही खाऊ व खडीसाखर मग का आणीत नाही? आणाल ना?’
‘तुझी आई जाऊ देत नाही आणायला?’
‘आई, जाऊ दे ना बाबांना.’

‘दूर जाऊ दे?’
‘दूर जाऊ दे.’

« PreviousChapter ListNext »