Bookstruck

तीन मुले 82

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘म्हटले खरे. परंतु नको विकू. ही जागा शेकडो आठवणींची. तू गेलास तर ही जागाच मला आधार देईल. या झोपाळयावर माझा मंगा बसे. तेथे निजे. ही फुले तो फुलवी. अशा आठवणी करीन. खरे ना! नको विकू ही जागा.’
‘बरे तर जशी तुझी इच्छा. मी बाहेर जाऊन येतो.’

मंगा बाहेर गेला. मधुरी काम करु लागली. तिचे आज कामात लक्ष नव्हते. काही तरी हुरहूर तिला लागली होती. मध्येच हातातील काम ती थांबवी व सुस्कारा सोडी. सोन्या, रुपल्या तिच्याजवळ आले. तिला काय वाटले कोणास कळे. तिने एकदम सारी मुले जवळ घेतली. त्यांचे तिने मुके घेतले. त्यांच्या कपाळावरुन, डोक्यांवरुन तिने हात फिरवले. मुले शांत बसली होती. आईला आज काय होते ते त्यांना कळेना. परंतु त्यांना निराळाच काही अनुभव आज येत होता. असा अनुभव पूर्वी कधी त्यांना आला नव्हता.

‘गोड आहेत. माझी बाळे गोड आहेत. असे ती त्यांना कुरवाळून म्हणाली. इतक्यात मंगा आला. तो ते गंभीर पावन दृश्य त्याला दिसले. तोही मधुरीजवळ जाऊन बसला. जणू सर्वांचा एकत्र फोटोच घ्यावयाचा होता. मंगा मधुरीला मुलाबाळांसह पोटात घेत होता. मधुरी मंगाला पोटात घेत होती. ती सर्वजणे बसली होती. मुले मध्येच आईबापांकडे पाहत व आईबाप त्यांचे पापे घेत.

‘मधुरी!’ मंगाने हाक मारिली.
‘काय मंगा?’

आपण सुखी आहोत, नाही?’ खरोखर सुखी.
होय हो मंगा.’ असे म्हणून तिने आपले डोळे पदराने पुसले.

« PreviousChapter ListNext »