Bookstruck

तीन मुले 98

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

केवढाल्या लाटा! ते बघ आई बाबांचे गलबत. आली लाट. बाबा, बाबा. अरे, कोठे आहे गलबत? कोठे आहेत बाबा? ते बघ, आई, ते बघ, लाटांतून हसत वर येत आहेत. खाऊ हातात आहे, चित्राचे पुस्तक आहे. ओहो, आले बाबा आले.’

वातात असे तो काही बोले. मधुरी दु:खाने सारे ऐके.
एके दिवशी बुधा एका वैद्याला घेऊन आला. मधुरी चपापली. तिने बसायला घातले.
‘मधुरी, वैद्याला घेऊन आलो आहे.’ बुधा म्हणाला.
‘तुला कोणी सांगितले सोन्या आजारी आहे म्हणून?’

‘मला सारे समजते.’
वैद्यबोवांनी परीक्षा केली. नाडी तपासली. जीभ पाहिली. डोळे पाहिले.
‘लक्षण बरी आहेत. नाडी चांगली आहे. मात्र मुळी उठू द्यायचे नाही.’
वैद्य म्हणाले.
‘पथ्यपाणी?’

‘ताक द्यायचे. गोड अदमुरे ताक.’
‘औषध?’
‘मी पुडया पाठवीन. त्या मधातून द्या. चाटवा.’
वैद्य निघून गेले. बुधा तेथेच बसला होता. तो गंभीर होता. मुका होता. सोन्याचा हात हातात घेऊन बसला होता.

‘मधुरी!’
‘काय?
‘तू एकटी किती जाग्रणे करणार? दिवस, रात्र किती शुश्रूषा करणार?
‘आजीबाईलाही सध्या बरे नाही. नाहीतर म्हतारी आली असती. ती एक आमचा आधार. आकाशच आता फाटले आहे.’

‘मधुरी!’
‘काय बुधा?’
‘मी नाही का आधार? मी नाही का आकाशाला थोडे ठिगळ लावणार? मी नाही का तुझा कोणी? मी आज आलो म्हणून का तुला वाईट वाटले? खरे सांग.’

‘बुधा, सांगायची काय जरुरी? मला काय वाटले असेल ते तुला नाही का कळत? न बोलता नाही का कळत?’
‘मधुरी!’
‘काय?’

‘तुला एक विचारू?’
‘विचार.’
‘मी येऊ का पहारा करायला? रात्री जागायला? नाही तर तुझे आणखी आंथरूण घालावे लागले. तू नाही आजारी पडता कामा.’

« PreviousChapter ListNext »