Bookstruck

तीन मुले 103

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशुभ वार्ता
असेच दिवस चालले होते. मधुरीच्या मंगाची आठवण सारे गाव जणू विसरून गेले. परंतु मधुरी कशी विसरेल? तिच्या जीवनाची सारी ओढ मंगाकडे होती. तिचे डोळे तिकडे होते. वाट पाहून ती दमली. रडून रडून डोळे कोरडे झाले. समुद्रावर जाणे तिने आता बंद केले. तेथे गेल्यावर तिला भरून येई म्हणून ती जाईनाशी झाली.

‘आई, अलीकडे तू का ग जात नाही समुद्रावर? सोन्याने विचारले.’
‘समुद्राकडे मला पाहवत नाही. तू जात जा.’ ती म्हणाली.

‘मी जाईन, बाबा आले की नाही पहात जाईन. त्यांची चौकशी करीत जाईन. आजीबाईकडे जाऊन खाऊ खाईन.’ सोन्या म्हणाला आणि खरेच सोन्या समुद्रावर जाऊ लागला आजीबाईजवळ गप्पा मारीत बसे. तिच्याजवळ खाऊ मागे. खाऊ खाई.
‘काय रे सोन्या, आईला फार वाईट वाटते का?’ म्हातारीने विचारले.

‘होय आजी. आई झोपतही नाही. रात्री देवाची प्रार्थना करीत बसते. आम्हांला जवळ घेते व रडते. ती समुद्रावर येत नाही. समुद्राकडे तिला बघवत नाही. आजी, खरेच बाबा नाही का येणार?’
‘येतील हो बाळ.’

‘केव्हा येतील? किती तरी दिवस झाले, का ग येत नाहीत? किती तरी गलबते येतात. बाबांचेच तेवढे का येत नाही? कोठे अडकले? कोठे रुतले? आजी, सांग कधी येईल त्यांचे गलबत?’
‘मी काय सांगू बाळ?’

अशी बोलणी चालत. सोन्या तिकडे खलाशांकडे जाई. त्यांच्याजवळ बोले. प्रश्न विचारी. सोन्या दिसे चांगला. खलाशांना त्याचे कौतुक वाटे.
‘तू येतोस का आमच्याबरोबर?’ खलाशी त्याला विचारीत.

‘बाबा गेलेत येत नाहीत. मग मी कशाला येऊ? आधी बाबा येऊ देत. आणा ना तुम्ही माझे बाबा.’ सोन्या सांगे.
आणि पुन्हा एक नवीन गलबत आले. बंदरावर गर्दी जमली.
व्यापारी आले. देवघेव करणारे आले.

‘आई, आज नवीन गलबत आले आहे. तू येतेस?’ सोन्याने विचारले.
‘बाळ, तूच जा व विचारून ये.’ ती म्हणाली.

सोन्या गेला. आईला वाईट वाटते, म्हणून त्याने आग्रह केला नाही. तो आला. तेथे त्याला कोण विचारतो? इकडे तिकडे फिरत होता. शेवटी कंटाळून तो म्हातारीच्या खानावळीत आला. तो तेथे एक प्रवासी उतरला होता. आजीबाईजवळ बोलत होता.

« PreviousChapter ListNext »