Bookstruck

तीन मुले 127

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी ती मंगाकडे आली. तो मंगा झोपलेला होता. मधुरीने दिलेली गोधडी त्याने अंगावर घेतली होती. राजकन्या पहात राहिली. मोठमोठी किंमतीची पांघरुण तेथे असता गोधडी पांघरलेली पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने मंगाला उठविले नाही. ती तेथे बसली. काही वेळाने मंगा जागा झाला. तो लाजला. त्याने ती गोधडी गुंडाळून ठेवली. राजकन्या निघून गेली.

सायंकाळी एका दुभाष्याला बरोबर घेऊन राजकन्या आली. तेथील एका मंचकावर ती बसली. तिने मंगाला स्वत:च्या जवळ बसविले.

‘तुम्ही एकटे आहात का?’ तिने विचारले.
‘येथे तर एकटा आहे.’ तो म्हणाला.

‘तुमच्या घरी कोण आहे?’
‘माझी पत्नी आहे; मुले आहेत.’

‘तुम्हांला त्यांची आठवण येते का?’
‘प्रत्येक क्षणाला येते. येथे माझे मन कशात रमत नाही. खाणेपिणे रूचत नाही. काय करावे कळत नाही.’

‘परंतु येथून तुम्हांला जाता येणार नाही.’
‘का बरे?’

‘येथील नियम असा आहे की, राजाच्या परवानगीशिवाय जाता येत नाही.’
‘राजा मला परवानगी देईल?’

‘ते राजाच्या हाती नाही.’
‘मग कोणाच्या?’

‘राजाच्या मुलीच्या ते हाती आहे. राजाची मुलगी तुम्हांला जाऊ देणार नाही. राजा तिची इच्छा मोडणार नाही. आपली मुलगी दु:खी कष्टी व्हावी असे कोणास वाटेल?’

‘राजाची मुलगी इतकी का दुष्ट आहे?’
‘प्रेम दुष्ट असते.’

‘प्रेम मधुर असते. प्रेमामुळे मनुष्य जगतो. प्रेमामुळे तरतो.’
‘प्रेमाला मत्सर असतो. तुमच्यावर दुस-या एका स्त्रीचे प्रेम असावे हे ह्या राजाच्या मुलीला खपत नाही. तुम्ही दुस-या एका स्त्रीचे स्वामी असावे हे तिला पाहवत नाही. ती तुम्हांला येथून जाऊ देणार नाही.’

« PreviousChapter ListNext »