Bookstruck

तीन मुले 131

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बुधाचा संसार
बुधाने बरेच दिवस मधुरीजवळ पुन्हा गोष्ट काढली नाही. परंतु पुन्हा एके दिवशी त्याने तो प्रश्न विचारला. ती अशीच फिरायला गेली होती. मुले खाली खेळत होती व ती दोघे त्या प्रेममय टेकडीवर होती.

‘मधुरी, मग काय? केलास का विचार? कधी संपणार तुझा विचार? या बुधाची दया कर. माझा अंत नको पाहू. स्वीकार माझे जीवन. ते कृतार्थ कर. सांग, काय ठरविलेस?’

‘बुधा, आणि मंगा आला तर काय म्हणेल?’
‘तुला वाटते का तो आता येईल? तो जिवंत असता तर कधीच येता. खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.’
‘परंतु माझ्या हृदयात एखादे वेळेस वाटते की तो कोठे तरी संकटात सापडला असेल. परंतु शेवटी सुखरूप येईल. असे का वाटते?’

‘मधुरी, आपण आजीबाईला जाऊन विचारू, चल.’
आणि ती दोघे म्हातारीकडे जायला निघाली. आम्ही आजीबाईकडे आहोत असे मुलांना सांगून ती दोघे गेली. म्हातारीकडे जायला निघाली. आम्ही आजीबाईकडे आहोत असे मुलांना सांगून ती दोघे गेली. म्हातारी खाटल्यावर पडली होती. तीही आता थकत चालली होती.

‘ये मधुरी, ये.’ ती म्हणाली.
‘आणि मला नाही का हाक मारीत?’ बुधाने विचारले.
‘तूही ये हो बुधा. तुझ्याबद्दल मला फार वाटते. तुझेही मधुरीवर प्रेम. इतकी वर्षे तपश्चर्या करीत आहेस. धन्य तुझी!’

‘आजी, तुला एक विचारायला आम्ही आलो आहोत.’ तो म्हणाला.
‘काय विचारायचे आहे?’ विचार.

‘आजी, मधुरीवर माझे व मंगाचे दोघांचे प्रेम होते. मधुरीने मंगाला माळ घातली. मी मुकाटयाने अश्रू ढाळीत माझ्या खोलीत बसून राहिलो. जग निजले म्हणजे दवबिंदू टप्टप् पडत असतात. जग निजावे परंतु हा बुधा जागाच असे. रडत बसे. आजपर्यंत मी असे दिवस काढले. मंगा व्यावारासाठी गेला तरीही मी दूर होतो. परंतु आता तर मंगा नाही. गलबत दुर्दैवाने बुडाले. कोणी वाचले नाही. संशय उरला नाही. दोन वर्षे होऊन गेली. मंगा असता तर येता. चिठी-निरोप येता. म्हणून मी मधुरीला म्हणत असे की मी तुमची दोघांची छोटी बायको होईन. ते म्हणणे देवाला खरे करायचे असेल कदाचित! आजी, मी काय वाईट सांगितले? मधुरीचे मजवर अजिबात प्रेम नसते तर गोष्ट निराळी. मलाही तिच्या जीवनात स्थान आहे. तिच्या हृदयात मला जागा आहे. सांग, आजी, तू सल्ला दे.’

« PreviousChapter ListNext »