Bookstruck

तीन मुले 139

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि बुधा मंगाचे भव्य चित्र रंगवू लागला. त्यात तो रमला. रंगला. मधुरी जवळ येऊन बसे व बघत राही. त्यामुळे बोटात अधिकच कला नाचू लागे.

‘डोळे हुबेहुब साधले आहेत. डोळयांवर सारे आहे.’ मधुरी म्हणाली.
‘सोन्याचे डोळे मंगासारखे आहेत, नाही?’ बुधाने विचारले.

‘आणि वेणूचे?’
‘तिचे माझ्यासारखे आहेत.’

‘रंगव. बोलू नकोस. मी जाऊ?’
‘नको जाऊ. तू येथेच बस; म्हणजे माझी कुंचली हळुवार चालते. असे ते चित्र तयार होत होते.’

‘त्या बाबांचे चित्र.’ सोन्या म्हणाला.
‘ते आले तर आता असे नाही दिसणार. ते तर म्हातारे झाले असतील.’ रुपल्या म्हणाला.

‘कशावरून रे?’ बुधाने विचारले.
‘मेलेली माणसे म्हातारी होतात.’ रुपल्या म्हणाला.

‘बाबा एकदम आले तर तू ओळखशील का ग आई?’ सोन्याने विचारले.
‘हो.’ ती म्हणाली.

‘काही तरीच. नाही ओळखता येणार. हे चित्रातले बाब छान आहेत.’ सोन्या म्हणाला.
‘आणि मी!’ बुधाने विचारले.

‘तुम्ही छान. दोघेही छान.’ तो म्हणाला.

एके दिवशी ते चित्र पुरे झाले. मधुरीच्या चित्रासमोरच्या भिंतीवर ते टांगण्यात अले. जणू एकमेकांकडे दोघे बघत आहेत व मंद स्मित करीत आहेत! एखादे वेळी मधुरी येई, त्या चित्रासमोर येऊन बसे व हात जोडी. माझा मंगा असे म्हणे. पुन्हा पटकन् उठून निघून जाई. तिच्या जीवनात बुधा शिरला होता. परंतु मंगाचे स्थान अढळ होते. मंगाला कोण नेणार? मृत्यू नेऊ शकणार नाही, समुद्र बुडू शकणार नाही. मंगा. मंगा अशीच हाक तिचे हृदय मुकेपणान मारीत होते.

« PreviousChapter ListNext »