Bookstruck

तीन मुले 142

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मंगा, माझी कीव कर. मनुष्याची निराशा करणे महापाप आहे. मी क्रूर झाले, माणूसघाणी झाले तर त्याचे पाप तुला लागेल.’
‘राजकन्ये, माझा काय इलाज आहे? मधुरीला मी विसरू शकत नाही. माझी मुलेबाळे रोज समुद्रावर येऊन माझी वाट पहात असतील. घरी खायला नसेल. अडचणी असतील. मधुरीने हाय घेतली असेल. तू माझी रवानगी कर. माझा, मुलाबाळांचा दुवा घे.’

‘बरे, मी विचार करीन.’
‘मधुरीचे प्रेम तुला जिंकून घेवो.’
राजकन्या गेली. ती एके दिवशी राजाला म्हणाली,
‘बाबा, मंगाचे मजवर प्रेम आहे.’

‘तो फसवील.’
‘फसवणार नाही. परंतु त्याचे म्हणणे एवढेच की, एकदा घरी जाऊन येऊ दे. सर्वांचा निरोप घेऊन येऊ दे. जाऊ दे ना बाबा त्याला?’

‘एकदा गेला की कसचा येतो?’
‘मीही जाते त्याच्याबरोबर. आम्ही दोघे परत येऊ. नाही तरी त्याच्या शिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही, आलो परत तर आलो. नाही तर मी तिकडेच राहील. जेथून त्याचे दर्शन घेता येईल अशा ठिकाणी राहीन. जाऊ का बाबा?’

‘मी काय सांगू? तुझ्या मनाला ज्याने समाधान वाटेल ते कर.’
‘बाबा, एका लहानशा होडीत बसून आम्ही जाऊ. तरायचे असेल तर देव आम्हांला तारील. मारायचे असेल तर एकदम मारील. तुम्ही नाही म्हणू नका.’

‘जशी तुझी इच्छा.’
आणि मगा तुरुंगातून बाहेर आला. राजकन्येने सर्वांचा निरोप घेतला. समुद्रतीरावर एक सुंदर होडी तयार करण्यात आली. तिला लहानसे शीड होते. त्या होडीत अन्नसामग्री होती. फळफळावळ थोडे फार होते. लहानशा होडीत जेवढी व्यवस्था करण्यासारखी होती तेवढी केली गेली आणि राजकन्या सुंदर वस्त्र नेसून अलंकारांनी नटून नवरीप्रमाणे उभी होती. तीरावर हजारो स्त्रीपुरुष जमले होते. राजकन्येने सर्वांचा निरोप घेतला. मंगाचा तिने हात धरला. होडीत बसली दोघे. तिने वल्हे हाती घेतले. निघाली होडी. अनंत समुद्रावर ती लहानशी नाव निघाली. ती टिकणार का बुडणार? देवाला माहीत!

होडी डोळ्यांआड होईपर्यंत लोक तीरावर होते. राजकन्येचे लक्ष आता कोठेच नव्हते. ती डोळे मिटून वल्हे मारीत होती. ती थकली. हात गाळून पडणार असे तिला वाटले. ती बोलली नाही.

‘मंगा!’
‘काय?’
‘मला पाण्यात लोटून दे. आणि या समुद्राच्या लाटांनी माझी समाधी बांध. तुझ्या हाताने मला मरण दे. फेक मला पाण्यात.’

‘काय हे बोलतेस?’
‘मी खरे ते बोलते.’
‘तू थकली आहेस. नीज. मी वल्हे मारतो.’

« PreviousChapter ListNext »